World Hindi Day 2019: 10 जानेवारीला का साजरा केला जातो जागतिक हिंदी दिवस?
Representational Image (Photo credits: Pixabay)

World Hindi Day 2019: हिंदी आपल्या सर्वांच्या परिचयाची भाषा. एकमेकांची भाषा कळत नसेल तर आपण संवाद साधण्यासाठी हिंदीचा आधार घेतो. 10 जानेवारी हा दिवस  जागतिक हिंदी दिवस (World Hindi Day) म्हणून साजरा केला जातो. हा खास दिवस रंजक बनवण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आज जगभरात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या पाच भाषांपैकी हिंदी एक आहे. इतकंच नाही तर जगभरातील 250 मिलियन लोकांची 'हिंदी' ही मातृभाषा आहे. जाणून घेऊया या दिवसाचे महत्त्व...

1948 मध्ये भारतीय संविधान लागू झाल्यानंतर 14 सप्टेंबर 1949 मध्ये हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा प्राप्त झाला. त्यानंतर दरवर्षी 14 सप्टेंबरला 'हिंदी दिवस' साजरा केला जावू लागला. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदीचा प्रचार-प्रसार करण्यासाठी आणि हिंदी एक सशक्त भाषा म्हणून ओळखली जावी, यासाठी 10 जानेवारी 1975 मध्ये नागपूरमध्ये पहिल्या 'विश्व हिंदी संमेलना'चे आयोजन करण्यात आले. या संमेलनात जगभरातील 30 देशांनी सहभाग घेतला होता. या संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून मॉरिशसचे पंतप्रधान श्री शिवसागर रामगुलाम (Shree Seewoosagur Ramgoolam) उपस्थित होते.

संयुक्त राष्ट्र संघात हिंदी भाषेला अधिकृत स्थान देणे, हे या संमेलनाचे उद्दिष्ट होते. मात्र या प्रयत्नाला हवे तसे यश मिळाले नाही. त्यानंतर 2006 मध्ये तत्कालीन पंतप्रधानांनी 10 जानेवारी हा 'हिंदी दिवस' म्हणून घोषित केला. यामुळे परदेशातही हिंदीबद्दल जागरुकता निर्माण करणे, हिंदी भाषेचा आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून प्रचार करण्यास मदत होईल, असे त्यावेळी पंतप्रधानांनी सांगितले.

आज अमेरिका, ब्रिटेन, जर्मनी, न्यूझीलँड (New Zealand), युगांडा (Uganda), सुरीनाम (Suriname), मॉरिशस साऊथ आफ्रिका (Moreish South Africa), पाकिस्तान (Pakistan), नेपाळ (Nepal) आणि बांग्लादेश  (Bangladesh) या देशातही हिंदीबद्दल रुची वाढत आहे. जगभरातील हिंदी भाषेवरचे प्रेम हे हिंदी सिनेमा आणि हिंदी टीव्ही चॅनलच्या संख्येवरुनच लक्षात येतेच.