महाराष्ट्रात 5 ऑगस्टपासून श्रावण (Shravan) सुरू झाला. या महिन्यात अनेक व्रत-वैकल्य, पूजा-अर्चना केली जाते. अनेक लोक विविध तीर्थक्षेत्रांना भेटी देतात. अशात श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर एसटीतर्फे ‘श्रावणात एसटी संगे तीर्थाटन’ (Shravanat ST Sange Tirthatan) हा नवीन उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या मोहिमेद्वारे ज्येष्ठ नागरिक, महिलांना मोफत आणि कमी दरात तीर्थयात्रेचा आनंद घेता येणार आहे. या मोहिमेचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.
श्रावण महिन्यामध्ये अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. त्या अनुषंगाने बहुतांश नागरिक कुटुंबासह तीर्थक्षेत्राला जाण्याचे नियोजन करतात. यासाठी एसटीने ‘श्रावणात एसटी संगे तीर्थाटन’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एसटीच्या प्रत्येक आगारातून श्रावण महिन्यात एकदिवसीय अथवा एक मुक्कामी धार्मिक सहलीचे आयोजन करण्यात येत असून, त्यामध्ये अनेक प्रकारच्या सवलती दिल्या जात आहेत. 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाचा लाभ मिळणार आहे. 75 वर्षांखालील तसेच महिला आणि 12 वर्षाखालील मुलांना अर्ध्या किमतीत तिकिटे मिळतील. (हेही वाचा; Bhimashankar Closed For 2 Months: श्रावणात भीमाशंकरला जाणाऱ्या पर्यटकांना मोठा झटका; 30 सप्टेंबरपर्यंत बंद असणार 'ही' ठिकाणे, वन विभागाची माहिती)
या तीर्थक्षेत्रांच्या सहलीचे आयोजन केले जाणार-
एसटीने जाहीर केलेल्या यादीत त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, मार्लेश्वर, अष्टविनायक, नृसिंहवाडी, औदुंबर आणि मारुती दर्शन यांचा समावेश आहे. ग्रामस्थ, महिला बचत गट, ज्येष्ठ नागरिक संघ, विविध सेवाभावी संस्था यांच्या पुढाकाराने अशा यात्रांचे आयोजन केले जाते.
एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर म्हणाले की, ‘या उपक्रमामुळे प्रवाशांचा ओघ वाढल्याने एसटीचे उत्पन्न वाढेल अशी आशा आहे. प्रवाशांची संख्या जसजशी वाढत जाईल, तसतसे कर्मचारी लोकांना अजून चांगली सेवा आणि नाविन्यपूर्ण उपक्रम देतील.