Bhimashankar forest (Photo Credit - Twitter)

Bhimashankar Closed For 2 Months: बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भीमाशंकर (Bhimashankar) हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात स्थित आहे. अतिशय घनदाट अरण्याने वेढलेल्या या ठिकाणी जवळजवळ वर्षभर पर्यटकांचा राबता असतो. पावसाळ्यात तसेच श्रावणात तर या ठिकाणी विशेष गर्दी पाहायला मिळते. मात्र सध्या सुरु असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर हे अध्यात्मिक पर्यटन स्थळ दोन महिन्यांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. येत्या 30 सप्टेंबरपर्यंत हे ठिकाण पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. भीमाशंकर अभयारण्य क्रमांक 1 चे वन परिक्षेत्र अधिकारी वसंत चव्हाण यांनी ही माहिती दिली.

महाराष्ट्रात आजपासून श्रावण महिना सुरू झाला आहे. या महिन्यात, भक्त भगवान शंकराची पूजा करतात आणि भगवान शंकराचे दर्शन घेण्यासाठी प्रसिद्ध मंदिरांना भेट देतात. श्रावणात भीमाशंकर ज्यातिर्लिंगाच्या दर्शनासाठीही मोठ्या संख्येने भाविक आणि पर्यटक येतात. मात्र भीमाशंकरकडे जाणाऱ्या रस्त्यांवर मुसळधार पावसामुळे दरड कोसळून अपघात होण्याची शक्यता असल्याने, हे स्थळ दोन महिन्यांसाठी बंद आहे.

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकरला पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी, पावसाळ्याच्या धुक्याने आच्छादलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि धबधब्यांचा अनुभव घेण्यासाठी भाविक आणि पर्यटक मोठ्या संख्येने इथे येतात. नैसर्गिक सौंदर्य असूनही, हे ठिकाण धोकादायक आणि पावसाळ्यात प्रवेश करणे कठीण आहे. अपघाताचा वाढता धोका लक्षात घेऊन प्राधिकरणाने भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य 1 आणि 2 मधील धबधब्यांकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

बंद असलेल्या ठिकाणांमध्ये कोंढवळ धबधबा, खोपीवलीतील चोंडी धबधबा, पदरवाडीजवळील न्हाणीचा धबधबा, नरिवलीतील सुभेदार धबधबा, खांडस ते भीमाशंकर रोड,  या घोंगळ घाट नाला आणि पदरवाडी ते काठेवाडी या शिडी घाट या मार्गांचा समावेश आहे. यासह घोंगळ घाट नाला आणि पदरवाडी ते काठेवाडी शिडी घाटही बंद असेल. या धबधब्यांच्या तलावातील पाण्याचा अंदाज न येणारा प्रवाह आणि खोली पर्यटकांसाठी मोठा धोका निर्माण करण्याची शक्यता आहे, म्हणून ही ठकाणी काही कालावधीसाठी बंद ठेवण्यात येत आहेत. (हेही वाचा: UNESCO World Heritage Site: आसामच्या Charaideo Maidam चा युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश; भारतामधील 43 वे स्थळ)

यासह, मुसळधार पाऊस आणि निसरड्या रस्त्यांमुळे सुमारे 5 किलोमीटर अगोदरच वाहने थांबवली जात आहेत. भीमाशंकरला भेट देणाऱ्या सर्व पर्यटकांनी पावसाळ्यात नियमांचे काटेकोर पालन करून अधिकाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन पुण्याच्या उपवनसंरक्षकांनी केले आहे. पर्यटकांना परवानगीशिवाय बेकायदेशीरपणे अभयारण्यात प्रवेश करण्यापासून सावध करण्यात येत आहे. प्रतिबंधित क्षेत्रात विनापरवानगी प्रवेश करणाऱ्यांवर वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे वन परिक्षेत्र अधिकारी वसंत चव्हाण यांनी सूचित केले. यापूर्वी जुलै महिन्यात महाराष्ट्र वन विभागाने ताम्हिणी वन्यजीव अभयारण्य आणि भीमाशंकर वन्यजीव अभयारण्यात पावसाळा संपेपर्यंत प्रवेशावर बंदी घातली होती. भुशी धरण आणि ताम्हिणी घाट येथे नुकत्याच झालेल्या अपघातांमध्ये अनेक जण वाहून गेल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.