Mumbai Mandwa Water Taxi चे दर  झाले स्वस्त; पहा Lower Deck, Executive Deck चा दर काय?
Water Taxi (Photo Credits-Twitter)

मुंबई मांडवा वॉटर टॅक्सीमधील (Mumbai Mandwa Water Taxi ) लोअर डेक (Lower Deck) आणि एक्झिक्युटिव्ह डेकसाठी (Executive Deck) असलेले भाडे अनुक्रमे 150 आणि 100 रुपयांनी कमी करण्यात आले आहे. बुधवार (16  नोव्हेंबर) पासून लागू करण्यात नव्या दरानुसार आता लोअर डेक चे भाडे 400 रुपयांवरून 250 रुपये आणि वरच्या किंवा एक्झिक्युटिव्ह डेकसाठी भाडे 450 रुपयांवरून 350 रुपयांवर आले आहे. त्यामुळे मुंबईकरांचा मुंबई-अलिबाग वॉटर टॅक्सीचा प्रवास अधिक किफायतशीर झाला आहे.

Nayan XI ही वॉटर टॅक्सी फेरी भाऊचा धक्का किंवा माझगाव येथील डोमेस्टिक क्रूझ टर्मिनल (DCT) आणि रायगड जिल्ह्यातील अलिबागजवळील मांडवा जेट्टी दरम्यान चालवली जाते. नयनतारा शिपिंग प्रायव्हेट लिमिटेड ऑपरेटर्सच्या प्रवक्त्याने इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार,अधिक प्रवासी मिळावेत आणि वॉटर टॅक्सी व्यवसायात चांगली स्पर्धा निर्माण करण्यासाठी भाडं कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वॉटर टॅक्सी सुरू झाल्यानंतर पहिल्या पंधरा दिवसामध्येच सुमारे 2500 लोकांनी या सेवेचा आनंद घेतला आहे. हे देखील नक्की वाचा: Mumbai-Mandwa Water Taxi: मुंबई-मांडवा वॉटर टॅक्सी आजपासून सुरू, आता अवघ्या 45 मिनिटांत होणार प्रवास .

नयन XI वॉटर टॅक्सी ही पूर्णपणे वातानुकूलित आहे. वरच्या बाजूला दोन आणि खालच्या डेकवर चार वॉश रूम्स आहेत. खालच्या डेकवर 140 आणि वरच्या डेकवर 60 जण एकावेळी बसू शकतात. मुंबईतील हे पहिले हाय-स्पीड डबल-डेक स्टेडी कॅटामरन आहे जे महासागर पार करण्यास सक्षम आहे. नव्याने लाँच केलेल्या जहाजाचा वेग 22 नॉट्सपर्यंत जाऊ शकतो आणि तो दक्षिण मुंबई आणि नवी मुंबई दरम्यान 15 नॉट्सवर जाऊ शकतो.

या वर्षी फेब्रुवारीमध्ये मुंबईत वॉटर टॅक्सी सेवा सुरू झाली. तर नयन इलेव्हन ही देशांतर्गत क्रूझ टर्मिनलची पहिली सेवा आहे.