गेल्या काही वर्षांमधील भारतीय रेल्वेची कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. रेल्वेने प्रवाशांसाठी अनेक नवीन योजना आणि सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. आता आयआरसीटीसी (IRCTC) ने विदेशात फिरायला जाणाऱ्या लोकांसाठी एक नवीन पॅकेज सुरू केले आहे. हे पॅकेज आहे सागरी टूरचे, IRCTC आता प्रवाशांना क्रुझद्वारे ही सागरी सफर घडवणार आहे. या पॅकेजच्या सहाय्याने पर्यटक 12 रात्री आणि 13 दिवसांच्या सफारीचा आनंद घेऊ शकतात. या सफारीमध्ये तब्बल सहा देश समाविष्ट करण्यात आले आहेत. 24 जून रोजी नॉर्वेजियन गेटवेपासून या यात्रेला सुरुवात होणार आहे.
डेन्मार्कपासून सुरु होणारा हा प्रवास जर्मनी, पोलंड, फिनलँड, रशिया आणि स्टॉकहोम इत्यादी देशांची भ्रमंती घडवेल. 6 जुलै रोजी कोपनहेगनमध्ये ही सहल संपेल. त्यानंतर पर्यटकांना दिल्लीपर्यंत विमान उपलब्ध करून दिले जाईल. या सागरी सफर पॅकेजची सुरूवात 3 लाख 16 हजार पासून सुरू होत आहे, तर सर्वाधिक महागडे पॅकेज हे 6 लाख 14 हजार इतके आहे. या पॅकेजमध्ये जेवण, स्विमिंग ऍक्टिव्हिटीज,प्रवासी विमा, व्हिझा शुल्क, हॉटेलचे भाडे तसेच परतीच्या प्रवासाच्या शुल्काचाही समावेश आहे. (हेही वाचा: मुंबई गोवा प्रवास आता आलिशान क्रुझमधून)
प्रवासामध्ये नॉर्वीयन पद्धतीच्या खाद्यांचा समावेश असल्याची माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी पिनाकीन मोरवाला यांनी दिली. जहाजामधील दोन डायनिंग रूममध्ये प्रवाश्यांना जेवण सर्व्ह केले जाईल. यामध्ये काही शिप्समध्ये ओपन एरिया बुफे पद्धतीचाही समावेश आहे.