Marathi Bhasha Din 2019: ज्ञानेश्वरांपासून ते खांडेकरांपर्यंत मराठी भाषेला असे लाभले वैभव
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Youtube)

Marathi Language Day: 27 फेब्रुवारी, मराठी भाषा दिन. ज्ञानपीठ पारितोषिक विजेते मराठी साहित्यिक, वि.वा.शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस मायबोली 'मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. 'नटसम्राट' या महान नाट्यकृतीसाठी कुसुमाग्रजांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला, तर 1988 मध्ये ज्ञानपीठ पुरस्कारानं त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव करण्यात आला. साहित्यातला सर्वोच्च पुरस्कार मिळवणारे कुसुमाग्रज दुसरे मराठी साहित्यिक होते. सामाजिक अन्याय, विषमता यावर कुसुमाग्रजांनी आपल्या लेखणीतून प्रहार केला. केवळ लिखाण करुन ते थांबले नाही तर चळवळींमध्येसुद्धा त्यांचा सहभाग होता. त्यामुळे एका अर्थाने कुसुमाग्रज सामाजिक चळवळीचे प्रणेते होते.

‘महाराष्ट्री प्राकृत’ या ‘संस्कृत’पासून उगम पावलेल्या भाषेचा कालांतराने इतर भाषांसोबत मिलाप होऊन ‘मराठी’ या भाषेचा विकास झाला. इसवी सन 875 च्या आधीपर्यंत आताच्या भारतीय खंडानुसार संपूर्ण दाक्षिणात्य प्रदेशावर सतवहन या योध्याचे शासन होते. गोदावरी नदीजवळील त्यावेळच्या ‘कोटिलंगला’ या करीमनगर जवळील ठिकाणी त्याची राजधानी होती. या राजाच्या शासनकाळात ‘महाराष्ट्री प्राकृत’ हीच त्याच्या राज्याची अधिकृत बोली-भाषा होती. उत्तरेकडील माळवे आणि राजपूत ते दक्षिणेकडील कृष्णा आणि तुंगभद्रा या नद्यांच्या खोर्‍यांमध्ये वास्तव्य करणार्‍या लोकांकडून त्यावेळी ‘महाराष्ट्री प्राकृत’ या भाषेचा वापर केला जात असे. आजच्या मराठी आणि कानडी भाषा या कित्येक काळापर्यंत ‘महाराष्ट्री प्राकृत’ भाषेचा भाग म्हणून ज्ञात होत्या. बहुतेक ऐतिहासिक संशोधनांतून हे स्पष्ट झाले आहे की, मराठी ही 8 व्या शतकापासून बहुतेक लोकांकडून बोलली जात असावी.

संत ज्ञानेश्वर (सन 1275 ते सन 1296) यांनी सन 1290 मध्ये लिहिलेले भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी) आणि अमृतानुभव ही काव्ये जगतविख्यात आहेत. त्यानंतर मराठीला सुगीचे दिवस प्राप्त झाले. संत ज्ञानेश्वरांनी त्यावेळी फक्त संस्कृतमध्ये उपलब्ध असलेल्या ‘भगवतगीते’ला मराठीमध्ये अनुवादित केले, तसेच मराठी मध्ये भावपूर्ण अभंगही लिहिले.

महानुभव पंथाचा विस्तार करीत वारकरी पंथातील संतकवी एकनाथ (सन 1528 ते सन 1599) यांनी ‘भावार्थ रामायण’ (मुख्यत्वे मराठीमधून) द्वारे समाजपयोगी संदेश दिले. संत तुकाराम (सन 1608 ते सन 1649) यांनी वारकरी पंथाची धुरा सांभाळून मराठीमध्ये सुमारे 3000 अभंग लिहिले.

छत्रपती शिवाजी महाराज (सन 1627 ते सन 1680) यांनी मराठीला देशाच्या काना-कोपर्‍यात विस्तार करण्यास तसे़च मराठीमध्ये साहित्य-विकास होण्यास वाव दिला.

18 व्या शतकातील वामन पंडित (यथार्थदीपिका), रघुनाथ पंडित (नल-दमयंति स्वयंवर), श्रीधर पंडित (पांडव प्रताप, हरीविजय, रामविजय) आणि मोरोपंत (महाभारत) या मंडळींनी मराठी साहित्यात अनमोल भर घातली. पेशव्यांनीही त्यांच्या शासनकाळात मराठीच्या विकासाकडे अधिक लक्ष पुरविले.

इंग्रज शासनकाळात मराठीच्या विकासाची घोड-दौड सुरूच राहिली. 1 मे, 1960 या दिवशी विदर्भ आणि मराठवाडा हे प्रांत मिळून संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली, आणि मराठीला संयुक्त महाराष्ट्राची अधिकृत मातृभाषा म्हणून दर्जा मिळाला. त्यानंतर  मराठी भाषेतील साहित्यावर चर्चा करण्यासाठी आणि विकास होण्यासाठी, दरवर्षी, नित्यनियमाने ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ भरवले जाऊ लागले. (हेही वाचा:मराठी आहात? मग तुम्हाला या गोष्टी माहिती असायलाच हव्यात!)

19 व्या शतकाच्या कालखंडामध्ये मराठी भाषेचे स्वरूप बरेच बदलले, भाषेला अनेक अलंकार प्राप्त झाले. गद्य, पद्य, नाटके यांमध्ये नव नवीन प्रयोग घडू लागले. कादंबरी आणि नाटके साहित्यप्रकारांत गणले जाऊ लागले. पु.ल.देशपांडे, प्र.के.अत्रे यांनी विनोदाला भाषेची जोड दिली. खांडेकरांच्या ययातीलाही ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

इंग्रजीचे आक्रमण आणि जागतिकीकरणाच्या झंझावातात मराठी भाषा आणि संस्कृती नष्ट होण्याची भीती सातत्याने व्यक्त केली जाते. परंतु आज जागतिक संदर्भातही मराठीभाषिकांची असलेली प्रचंड संख्या पाहता तिच्या ऱ्हासाची ही भीती अनाठायी आहे असेच म्हणावे लागेल. खरे तर आज मराठी भाषेच्या संवर्धनाचे अनेकानेक मार्ग खुले झाले आहेत. संगणकीय तंत्रज्ञानही मराठी भाषेत उपलब्ध होत आहे. विविध ज्ञानशाखांमधील उपयुक्त ज्ञान आज मराठीत येत आहे. या सगळ्याला जोड असायला हवी ती आपल्या निग्रहाची, मराठी भाषेबद्दल रास्त अभिमान बाळगण्याची आणि तिची जोपासना व संवर्धनासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची.