गेल्या तीन महिन्यांपासून कोरोना व्हायरसने (Coronavirus) संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. भारतात 2 लाखांपेक्षा अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचे संक्रमण थांबवण्यासाठी देशात आतापर्यंत 5 वेळा लॉकडाऊन घोषीत करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ऑफिस बंद तर काही कार्यालयाची कामे घरातून केली जात आहेत.
मात्र, लॉकडाऊन 5.0 मध्ये केंद्र सरकारने अनेक बाबींमध्ये शिथिलता दिली आहे. त्यामुळे अनेक कार्यालयं पुन्हा सुरू झाली आहेत. त्यामुळे तुम्हीदेखील ऑफिसला जाण्याचा विचार करत असाल, तर घर ते ऑफिस प्रवासादरम्यान कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी खास काळजी घेणं आवश्यक आहे. (हेही वाचा - First Monsoon Health Tips: पहिल्या पावसात भिजण्याची मजा घ्यायची असेल तर 'या' गोष्टींची घ्या विशेष काळजी)
कोरोना विरोधातील लढाई जिंकण्यासाठी प्रत्येकाने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना स्वत: ची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. आज या लेखातून आपण कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी घर ते ऑफिस असा प्रवास करताना कोणती काळजी घ्यायची यासंदर्भात काही टिप्स जाणून घेणार आहोत.
घराबाहेर पडताना घ्या 'ही' काळजी -
सर्वात अगोदर म्हणजे घराबाहेर पडताना हँड सॅनिटाइझर ची बॉटल घ्यायला विसरू नका.
घराबाहेर पडण्याअगोदर चेहऱ्यावर मास्क घाला. मास्क नसेल तर रुमालाने आपला संपूर्ण चेहरा झाकून घ्या. मास्क किंवा रुमालामुळे आपलं नाक आणि तोंड उघडं राहणार नाही याची काळजी घ्या.
प्रवास करताना कोणत्याही वस्तूंना स्पर्श करणं टाळा. एखाद्या वस्तूला स्पर्श केला तर लगेचचं हात सॅनिटाइझरने स्वच्छ करा.
गर्दीच्या किंवा सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिगचं पालन करा.
कार्यालयात गेल्यानंतर आपल्या सहकर्मचाऱ्यांसोबत काम करतानादेखील योग्य अंतर राखा.
ऑफिसमधील वस्तूंना हात लावणं टाळा. आपला लॅपटॉप आणि इतर कामाच्या वस्तू दररोज सॅनिटाइझ करून घ्या.
घर आणि ऑफिस असा प्रवास करताना बाहेरील कोणत्याही वस्तू खाऊ नका.
कार्यालयात जाण्यासाठी तुम्ही स्वत:च्या गाडीचा वापर करत असाल तर घरी आल्यानंतर गाडी सॅनिटाईझ नक्की करा.
प्रवासादरम्यान कोणत्याही वस्तूंची खरेदी करू नको. तसेच ऑफिसवरून घरी आपल्यानंतर गरम पाण्याने अंघोळ करा. याशिवाय प्रवासात वापरलेले कपडे स्वच्छ पाण्याने धुवून काढा.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि कोरोना विरोधातील लढाई जिंकण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी स्वत:ची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे घर ते ऑफिस असा प्रवास करताना वरील सर्व सुचनाचे पालन करणं आवश्यक आहे. या टिप्स योग्यरित्या फॉलो केल्याने तुम्हाला कोरोनाचे संक्रमण होण्याची शक्यता कमी आहे.