पहिला पाऊस! हा केवळ विचारच मनाला गारवा देणारा असतो. पहिल्या पावसाच्या प्रत्येकाच्या खास आठवणी असतात. कारण अनपेक्षितपणे पडलेला हा पाऊस (Monsoon) उन्हाच्या उकाड्याने झालेला त्रास चटकन दूर करतो. त्यामुळे अनेकांना पहिला पाऊस, मातीचा सुगंध या गोष्टी हवाहव्याशा वाटतात. त्यामुळे प्रत्येकजण चातकाप्रमाणे पहिल्या पावसाची वाट पाहत असतो. अनेकांची पहिल्या पावसात मनसोक्त भिजण्याची इच्छा असते. मात्र तुम्हाला माहित आहे का पहिला पाऊस हा जितका गारवा देणारा असतो तितकाच तो अनेक आजारांना आमंत्रण देणारा देखील असतो. त्यामुळे पहिल्या पावसात विशेष काळजी घेण गरजेचे आहे.
पहिल्या पावसात भिजण्याची मजा काही औरच असते. यामुळे प्रत्येकाला या पावसातील मजा अनुभवावी असे वाटते. त्यासाठी आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.
पावसात भिजायचे असेल तर काही महत्त्वाच्या गोष्टी
1. पावसात भिजायला जाण्यापूर्वी शक्यतो शर्ट, पँट असे अंग झाकून जाईल असे पूर्ण हाताचे कपडे न घालता हाफ स्लिव वा शॉर्ट घालावेत. जेणेकरून ओल्या कपड्यात सर्दी वा थंडी पकडणार नाही.
2. त्वचेची काही समस्या असल्यास त्वचेला बॉडी लोशन लावून बाहेर पडावे.
हेदेखील वाचा- Monsoon Tips: पावसाळ्यात डासांचा त्रास दूर करण्यासाठी घरात ही 5 झाडं लावणं ठरेल फायदेशीर
3. पावसाच्या पाण्याने केस ड्राय होतात त्यामुळे पावसात भिजताना केसांना छान तेल लावून जावे.
4. पावसात भिजताना पावळ्याखाली, शेड्सखाली न उभे राहता मोकळ्या जागी पावसात भिजावे. कारण पहिल्या पावसात छपरांवरील सर्व धूळ, कचरा हा खाली फेकला जातो.
5. पावसातून भिजून आल्यावर त्वरित केस पुसून घ्यावे. जमल्यास गरम पाण्याने आंघोळ करावी. त्यामुळे काही आजार उद्भवणार नाही. स्वच्छ सुके कपडे घालावेत.
हे सर्व करत असतानाच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाऊस भिजायचे म्हटले की जास्त वेळ भिजण्याचा मोह काही जणांना आवरत नाही. मात्र असे न करता स्वत:वर संयम ठेवून काही वेळ पावसात मजा म्हणून भिजावे. जास्त वेळ पावसात भिजल्यास आजारांना सामोरे जाऊ लागते.