अँटी व्हायरल ड्रग Remdesivir चा कोविड-19 (Covid-19) रुग्णांवर अगदी अत्यल्प परिणाम दिसून आल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organisation) म्हटले आहे. Remdesivir औषधामुळे रुग्ण बरे होण्याचा कालावधी किंवा मृत्यूची शक्यताही कमी होत नाही. जागतिक आरोग्य संघटनेने 30 पेक्षा अधिक देशांमधील 11,266 रुग्णांवर remdesivir, hydroxychloroquine, anti-HIV drug combination lopinavir/ritonavir and interferon या औषधांचा प्रयोग केला होता. त्या प्रयोगातून आलेल्या निष्कर्षानुसार, कोरोना बाधित रुग्णांवर होणारा remdesivir चा परिणाम अत्यंत अल्प आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाल्यावर हे औषध देण्यात आले होते.
कोविड-19 संसर्गामुळे हॉस्पिटलमध्ये भरती झालेल्या रुग्णांमध्ये या औषधाचा अगदी अत्यंत अल्प किंवा नगण्य स्वरुपाचा परिणाम रुग्णांवर दिसून येतो. दरम्यान, या ट्रायल्सचे रिझल्ट पुन्हा एकदा तपासण्यात येणार आहेत. (महाराष्ट्रात कोरोनाविरूद्ध Remdesivir ची क्लिनिकल ट्रायल सुरू; वाढत्या रूग्णसंंख्येच्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय)
अमेरिकेतील Gilead यांनी Remdesivir औषधांच्या परिणामांचा अभ्यास केला होता. त्यानुसार या औषधामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांची रिकव्हरी 5 दिवस लवकर होते, असे Gilead यांनी या महिन्याच्या सुरुवातीला म्हटले होते. Gilead यांनी रॉयटर्स ला दिलेल्या माहितीनुसार, WHO कडून येणारा डेटा विसंगत आहे. वेगवेगळ्या अभ्यासातून आणि काही जर्नल्समधून remdesivir चे फायदे समोर येत आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेचे चीफ सायन्टिस्ट सौमय्या स्वामीनाथन यांनी बुधवारी सांगितले की, "hydroxychloroquine आणि lopinavir/ritonavir या औषधांचे काहीच परिणाम दिसून न आल्याने जूनमध्ये त्यांच्या ट्रायल्स थांबवण्यात आल्या. इतर औषधांचे ट्रायल्स 30 पेक्षा अधिक देशांमध्ये 500 विविध हॉस्पिटल्समध्ये सुरु आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये बनवलेल्या नवीन अँटी व्हायरल ट्रग्स आणि monoclonal anti-bodies यांच्यावर आम्ही अधिक भर देत आहोत. त्यावरुन आपल्याला पुढचे पाऊल ठरवता येईल."
Remdesivir या औषधाला अमेरिकेतील अन्न व औषध प्रशासनाकडून 1 मे रोजी मंजूरी देण्यात आली होती, त्यानंतर विविध देशांमध्ये हे औषध कोरोना रुग्णांवर वापरण्यात येत आहे.