Pollution Effect On Human Private Part: प्रदूषणामुळे लहान होत आहे मानवी लिंगाचा आकार; अहवालातून धक्कादायक खुलासा
प्रतिकात्मक फोटो (For Representational Purposes Only)

सध्या शास्त्रज्ञांनी केलेला एक दावा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. न्यूयॉर्कमधील माउंट सिनाई हॉस्पिटलमधील प्रोफेसर डॉ.शन्ना स्वान (Dr Shanna Swan) यांनी आपल्या संशोधनात म्हटले आहे की, पुरुषांचा प्रायव्हेट पार्ट (Penis) प्रदूषणामुळे (Pollution) लहान होत चालला आहे. स्वान यांनी त्यांच्या संशोधनाच्या आधारे एक पुस्तक लिहिले आहे, ज्यामध्ये त्यांनी दावा केला आहे की, प्रदुषणामुळे मानवतेसमोर ‘वंध्यत्व संकट’ उद्भवू शकते. प्लास्टिक बनवण्यासाठी वापरले जाणारे केमिकल फिथलेट्स (Phthalates) यासाठी कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. यामुळे मानवी मुले विकृत लिंगासह जन्म घेत असल्याचे सांगितले आहे.

डॉ. स्वान यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे की, प्रदूषणामुळे गेल्या काही वर्षांत जन्मलेल्या मुलांच्या लिंगाचा आकार कमी होत आहे. आधुनिक जगातील पुरुषांचे कमी होत असलेले शुक्राणू, स्त्रिया आणि पुरुषांच्या जननेंद्रियांमध्ये होणारे विकासात्मक बदल आणि मानवजातीच्या समाप्तीविषयी हे पुस्तक भाष्य करते. फिथलेट्समुळे मानवी Endocrine System वर परिणाम होतो. मानवातील हार्मोन्सचे स्त्राव Endocrine System द्वारेच होतात. पुनरुत्पादक हार्मोन्सचे स्राव देखील या प्रणालीद्वारे होते. याव्यतिरिक्त, गुप्तांग विकसित करणारे हार्मोन्स देखील या प्रणालीच्या सूचनेनुसार बाहेर पडतात.

अहवालानुसार, डॉ. स्वान यांना जेव्हा नर उंदरांच्या लिंगामध्ये फरक जाणवला तेव्हा त्यांनी फिथलेट्स सिंड्रोमची तपासणी सुरू केली. अभ्यासादरम्यान, डॉ. स्वान यांना असे आढळले की, केवळ नर उंदीरच नाही तर मादी उंदरांच्या गर्भावरही याचा परिणाम होत आहे. त्यांचे पुनरुत्पादक अवयव लहान होत आहेत. मग त्यांनी ठरवले की ते मानवांवर याचा अभ्यास करतील.

अहवालात असेही म्हटले आहे की फिथलेट्स शरीरात एस्ट्रोजेन हार्मोनची नक्कल करतात. याचा परिणाम शारीरिक वाढीच्या हार्मोन्सच्या दरावर होतो आणि मानवी शरीराचे अवयव बिघडू लागतात. दरम्यान, पुरुषांचे प्रायव्हेट पार्टस लहान होत आहेत ही गोष्ट दर्शवणारी हे काही पहिले संशोधन नाही. यापूर्वी 2017 मध्ये एका अहवालात असे म्हटले गेले होते की, मागील चार दशकांत पाश्चात्य देशांतील पुरुषांची शुक्राणूंची संख्या 50 टक्क्यांहून कमी झाली आहे. डॉ. स्वान यांचा विश्वास आहे की, ज्या पद्धतीने प्रजनन दर कमी होत आहे, 2045 पर्यंत बहुतेक पुरुष असे शुक्राणू तयार करू शकणार नाहीत जे गर्भाची निर्मिती करू शकतात.