कोरोनाचा विळखा (Coronavirus) दिवसागणिक अधिकच भीषण होत आहे. मागील महिन्याभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमाल वेगाने वाढली असून सध्या देशात तब्बल 59 हजाराहून अधिक रुग्ण आढळले आहेत. आपण जर का कोरोनाबाधित रुग्णांबाबत नीट निरीक्षण केले तर काही बाबी कॉमन आढळून येतात, वय अधिक असणाऱ्या किंवा अन्य आजार असणाऱ्या मंडळींना कोरोनाचा सर्वाधिक धोका असतो.या दोन्ही बाबतीत व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने कोरोनाचा विषाणू प्रबळ ठरतो. अशावेळी आपण स्वतःची काळजी घेताना रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे हे उद्दिष्ट ठेवायला हवे. यासाठीच आयुष मंत्रालयाकडून (Ayush Ministry) काही आयुर्वेदिक आणि नैसर्गिक पद्धती सांगण्यात आल्या आहेत. या टिप्स कोणत्या ते आपण या लेखात जाणून घेऊयात
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे नैसर्गिक उपाय
- शरीराचे स्वास्थ्य टिकवण्यासाठी निदान दिवसातील एक तास व्यायाम करा. प्राणायाम, योगासने, हे मार्ग यासाठी अधिक उत्तम.
- उन्हाळ्याचा मोसम असल्याने शरीराला हायड्रेटेड ठेवणे गरजेचे आहे. यासाठी कोमट पाण्याचे सेवन करा.
- जेवणात जिरे, हळद आलं, लसूण, कोथिंबीर, यांचा आवर्जून समावेश करा.
-दिवसातून दोन वेळा हळदीचे कोमट दूध घ्या. एकावेळेस 150 मिली इतके प्रमाणही पुरेसे आहे.
- चहा बनवताना त्यात तुळस, काळी मिरी, दालचिनी, सुंठ, बेदाणे, गुळ, लिंबाचा रस या वस्तू सुद्धा समाविष्ट करा.
- सकाळ/ संध्याकाळ नाकपुड्यांमध्ये तिळाचे, खोबऱ्याचे तेल किंवा तूप लावावे.
- पुदिना आणि ओव्याच्या पाण्याची वाफ घ्या.
- दोन ते तीन लवंगा दिवसातून एकदा मध किंवा साखरेसोबत खा.
दरम्यान, हे नैसर्गिक उपचार हे खबरदारीचा पर्याय म्हणून सांगण्यात आले आहेत. मात्र सर्दी- खोकला, ताप यासारखे कोणतेही लक्षण आढळल्यास संबंधित व्यक्तीने त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा या उपायांवर अवलंबून राहू नये. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या औषधे घेणे सुद्धा टाळावे.