आरोग्यासाठी दुधापेक्षा जास्त फायदेशीर आहे बिअर; PETA ने केला दावा, जाणून घ्या कारणे
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: Facebook)

मद्य किंवा बिअर (Beer) पिणे आरोग्यासाठी चांगले नाही असे सांगितले जाते. कदाचित म्हणूनच आपल्याला लहानपणापासूनच दूध पिण्याच्या फायद्यांविषयी जास्त सांगितले जाते. मात्र आता, पेटा (पीपल्स फॉर एथिकल ट्रीटमेंट ऑफ़ अ‍ॅनिमल्स) ने, दूध पिण्यापेक्षा बिअर पिणे जास्त फायदेशीर असल्याचे सांगितले आहे. बिअर पिण्याने फक्त हाडेच मजबूत होतात असे नाही, तर ते पिल्याने आयुष्य देखील वाढते. म्हणूनच पेटाने लोकांना दूध न पिण्याचा सल्ला दिला आहे. हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या अहवालाच्या आधारे पेटाने हा दावा केला आहे.

पेटानेही दूध पिण्याचे अनेक तोटे सांगितले आहेत. दुधामुळे लठ्ठपणा, मधुमेह आणि कर्करोग यांसारखे घातक रोग देखील होतात असे पेटाचे म्हणणे आहे. बिअरला अल्कोहोलयुक्त पेय मानले जाते. मात्र ते बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या घटकांमध्ये पुष्कळ पोषक तत्त्वे आढळतात. बिअर तयार करण्यासाठी बार्ली, गहू, कॉर्न आणि तांदूळ यांचा वापर केला जातो. इतकेच नाही तर बिअरमध्ये 90 टक्के पाण्याव्यतिरिक्त फायबर, कॅल्शियम, लोहासह शरीराला फायदेशीर असे अनेक पोषक घटक आहेत.

बिअर मानवी हाडे मजबूत करण्याचे महत्वाचे कार्य करते. हे शरीराच्या स्नायूंच्या विकासासाठी खूप फायदेशीर असल्याचेही म्हटले आहे. दुसरीकडे दूध पिण्यामुळे हृदयरोग, लठ्ठपणा, मधुमेह आणि कर्करोगासारखे बरेच रोग होतात. म्हणूनच पेटाने जारी केलेल्या निवेदनात, दुधापेक्षा बिअर अधिक फायदेशीर असल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु लक्षात घ्या बिअर हे अल्कोहोल असलेले उत्पादन आहे. जास्त बिअर पिणे देखील आरोग्यासाठी धोकादायक आहे. (हेही वाचा: प्रमाणात घेतलेल्या बिअरचे काही आश्चर्यचकित करणारे फायदे)

दरम्यान, बिअर पिण्याचे फायदे यापूर्वीही बर्‍याच वेळा संशोधनातून समोर आले आहेत. एका संशोधनात असे सांगितले गेले होते की, वाइन आणि बिअर हे पूरक आहार असून, तो हृदयाच्या आरोग्यास सुधारू शकतो. इतकेच नाही तर याच्या सेवनाने हृदयरोगामुळे अकाली मृत्यूची शक्यता देखील कमी होऊ शकते.