Dev Deepawali 2023 Date: देव दिवाळी (Dev Deepawali 2023) दरवर्षी कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते. दिवाळीप्रमाणेच देव दिवाळीलाही (Dev Deepawali) हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. या सणाला दिव्यांचा उत्सव असेही म्हणतात. देव दिवाळीचा हा पवित्र सण दिवाळीच्या 15 दिवसांनी साजरा केला जातो. हा सण प्रामुख्याने काशीमध्ये गंगा नदीच्या काठावर साजरा केला जातो. असे मानले जाते की या दिवशी देव काशीच्या पवित्र भूमीवर अवतरतात आणि दिवाळी साजरी करतात. देव दिवाळीच्या दिवशी वाराणसीचे घाट मातीच्या दिव्यांनी सजवले जातात. काशीमध्ये कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देव दिवाळी साजरी करण्याची परंपरा शतकानुशतके चालत आली आहे. या दिवशी काशी शहरात एक वेगळाच आनंद पाहायला मिळतो. आजूबाजूला बरीच सजावट केली जाते. या दिवशी दिव्यांच्या दानाचे महत्त्वही शास्त्रात सांगण्यात आले आहे. देव दिवाळीची तारीख आणि या दिवशी दिवे दान करण्याचे महत्त्व जाणून घेऊया...(हेही वाचा - Tulsi Vivah 2023 Mangalashtak: तुळशी विवाह निमित्त 'हे' खास स्वरातील मंगलाष्टके लावून थाटामाटात लावा तुळशीचं लग्न, Watch Video)
देव दिवाळी 2023 तारीख -
कॅलेंडरनुसार, कार्तिक पौर्णिमा 26 नोव्हेंबर रोजी दुपारी 03:52 पासून सुरू होत आहे. दुसऱ्या दिवशी 27 नोव्हेंबर रोजी दुपारी 02:45 वाजता संपेल. त्यामुळे उदयतिथी लक्षात घेऊन 27 नोव्हेंबर 2023 रोजी कार्तिक पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. या दिवशी भगवान सत्यनारायणाची पूजा करणे, पौर्णिमा व्रत करणे, कार्तिक गंगेत स्नान करणे आणि दान करणे शुभ मानले जाते. देव दिवाळी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी प्रदोष काळात साजरी केली जाते. या दिवशी गंगा नदीच्या घाटांवर आणि वाराणसीतील मंदिरात दिवे लावले जातात. यावेळी कॅलेंडरमधील फरकामुळे देव दिवाळी 26 नोव्हेंबर आणि कार्तिक पौर्णिमा 27 नोव्हेंबर 2023 रोजी साजरी केली जाईल.
देव दिवाळी शुभ मुहूर्त -
देव दिवाळी साजरी करण्याचा शुभ मुहूर्त 26 नोव्हेंबर रोजी असून देव दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी 5:08 ते 7:47 पर्यंत आहे. या दिवशी संध्याकाळी पिठाचे 11, 21, 51, 108 दिवे लावून ते नदीच्या काठी अर्पण करणं फलदायी मानलं जातं.
देव दिवाळीचे महत्व -
कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिवाने त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. त्रिपुरासुराच्या वधानंतर सर्व देवी-देवतांनी एकत्र येऊन उत्सव साजरा केला. असे म्हटलं जातं की या दिवशी सर्व देवी-देवता भगवान शिवासह पृथ्वीवर येतात आणि दिवे लावून देव दिवाळी साजरी करतात. म्हणून दरवर्षी कार्तिक पौर्णिमेच्या तिथीला काशीमध्ये देव दिवाळी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते.
देव दिवाळीला दिवे दान करण्याचे महत्व -
धार्मिक शास्त्रांमध्ये देव दिवाळीच्या दिवशी गंगेत स्नान केल्यानंतर दिवा दान करण्याचे महत्त्व सांगितले आहे. या दिवशी गंगास्नानानंतर दिवे दान केल्याने वर्षभर शुभ फळ मिळते.