When Is Bail Pola: श्रावणातील शेवटचा सण म्हणजे बैल पोळा आहे. हिंदू धर्मात निसर्ग आणि प्राण्यांवर प्रेम करायला शिकवले जाते, कृतज्ञता व्यक्त करणे शिकवले जाते, वटपौर्णिमा असो नागपंचमी असो किंवा बैलपोळा, शेतकऱ्यांचा प्रत्येक सुख दुःखात सहभागी असणारा आणि वर्षभर राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण साजरा केला जातो. श्रावण महिन्यातील अमावास्येला बैलपोळा साजरा करण्याची पद्धत आहे. महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात हा सण साजरा करण्याची पद्धत आहे चला तर जाणून घेऊया कधी आहे बैलपोळा आणि कसा साजरा केला जातो हा बळीराजाचा सण, वाचा संपूर्ण माहिती [हे देखील वाचा: Ganesh Chaturthi 2022 Date: गणेश चतुर्थीची तारीख, तिथी, पूजा पद्धत, मुहूर्त आणि पूजा साहित्य यादी, जाणून घ्या]
बैलपोळा सण कधी आहे, जाणून घ्या तारीख
बैलपोळा 26 ऑगस्ट रोजी आहे . श्रावणी अमावास्येच्या दिवशी पोळा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्याची पद्धत आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये हा सण साजरा केला जातो.बैलपोळ्याचे शेतकरीवर्गात विशेष महत्त्व असते.
बैलांचा साजशृंगार
पोळा सणाच्या आदल्या दिवशी सकाळी बैलांना रितसर आमंत्रण दिले जाते.“आज आवतण घ्या,उद्या जेवायला या“ असे म्हणून आमंत्रण दिले जाते. बैलांना छान अंघोळ घातली जाते. बैलाच्या खांद्याला हळद व तुप लावले जाते. बैलाला सुंदर सजवले जाते. नवी वेसण, नवा कासरा पाठीवर नक्षीकाम झूल घातले जातात. डोक्याला बाशिंग, गळ्यात माळा, पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालतात.
असा साजरा करतात पोळा, जाणून घ्या
घर सजवले जाते, घरासमोर रांगोळी काढली जाते, गोडाचा नैवेद्य केला जातो, लाडक्या बळीराजाला सजवल्यानंतर अनेक ठिकाणी वाजत गाजत मिरवणूक काढली जाते अनेक गावात बैल पोळ्याच्या दिवशी जत्रा भरते. अशा प्रकारे बैलपोळ्याचा सण उत्साहात साजरा केला जातो.