Ganpati Visarjan 2024 Shubh Muhurat (फोटो सौजन्य - File Image)

Ganpati Visarjan 2024 Shubh Muhurat: सनातन धर्मात अनंत चतुर्दशीचे व्रत विशेष मानले जाते. अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi 2024) ला अनंत चौदस असेही म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. या दिवशी गणपतीचे विसर्जन केले जाते. हिंदू दिनदर्शिकेनुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला अनंत चतुर्दशी हा सण साजरा केला जातो. अनंत चतुर्दशीला बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन ढोल-ताशाच्या गजरात तलाव, नदी किंवा समुद्रात केले जाते. या वर्षी गणपती विसर्जनाचा शुभ मुहूर्त (Ganesh Visarjan Shubha Muhurta) कधी आहे? पूजाविधी याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

अनंत चतुर्दशी कधी आहे?

यावेळी अनंत चतुर्दशीची तिथी 16 सप्टेंबर रोजी दुपारी 3.10 वाजता सुरू होईल आणि 17 सप्टेंबर रोजी सकाळी 11.44 वाजता समाप्त होईल. उदयतिथीनुसार, यावेळी अनंत चतुर्दशी मंगळवार, 17 सप्टेंबर रोजीच साजरी केली जाणार आहे. (हेही वाचा - Anant Chaturdashi Images 2024: अनंत चतुर्दशीनिमित्त WhatsApp Stickers, GIF Greetings, Wallpapers च्या माध्यमातून पाठवा खास संदेश)

गणपती विसर्जन 2024 शुभ मुहूर्त -

17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. या दिवशी गणपती विसर्जनासाठी अनेक शुभ मुहूर्त आहेत. द्रिक पंचांग नुसार पहिला मुहूर्त सकाळी 9:10 ते दुपारी 1:47 पर्यंत, दुसरा मुहूर्त 3:18 PM ते 5:50 PM आणि तिसरा मुहूर्त संध्याकाळी 7:51 ते 9:19 पर्यंत असेल. या शुभ मुहूर्तांमध्ये तुम्ही विधींनुसार गणपतीला निरोप देऊ शकता.

गणपती विसर्जनाची पद्धत/पूजाविधी -

बाप्पाच्या विसर्जनासाठी आधी लाकडी आसन तयार करून त्यावर स्वस्तिक चिन्ह बनवून गंगाजल शिंपडावे. यानंतर गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून, नवीन पिवळे वस्त्र परिधान करून कुमकुम तिलक लावावा. तसेच अक्षत, फुले व मोदक अर्पण करावेत. त्यानंतर आपण आपल्या कुटुंबासह श्रीगणेशाची आरती करावी आणि झालेल्या चुकीबद्दल क्षमा मागून मूर्तीचे विसर्जन करावे.