Tulsi Vivah Mangalashtak In Marathi Text: तुळशी विवाह मराठी मंगलाष्टके, कोणालाही गाता येतील अशा शब्दांमध्ये
Tulsi Vivah | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Tulsi Vivah Mangalashtak in Marathi Text: तुळशी विवाह भारतात मोठ्या थाटामाटात आणि भक्ती भावाने साजरा केला जातो. दिवाळीच्या साधारण नंतर आठवडाभरानंतर तुळशी विवाहाचा सण साजरा करण्याची जुनी परंपरा आहे. या दिवशी चातुर्मास संपतो आणि भगवान विष्णू त्यांच्या चार महिन्यांच्या दीर्घ झोपेतून जागे होतात. या दिवसापासून सर्व शुभ कार्याला सुरुवात करता येते, असे मानले जाते. तुळशी विवाहाच्या दिवशी विष्णूचे रूप असलेल्या शालिग्रामचा विवाह तुळशी सोबत करण्याची परंपरा आहे. तुळशीविवाहावेळी मंगलाष्टके म्हणून अक्षता टाकल्या जातात. मात्र, सर्वांनाच हे मंगलाष्टकं पाठांतर असतात असे नाही. त्यामुळे आपण इथे दिलेल्या मंगलाष्टकांचा आधार घेऊ शकता.  तुळशी विवाह निमित्त 'हे' खास स्वरातील मंगलाष्टके लावून थाटामाटात लावा तुळशीचं लग्न, व्हिडिओ लावून तुळशीचं लग्न लावू शकता.

तुळशी विवाहा निमित्त मंगलाष्टके.

स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं, मोरेश्वरं सिद्धिदं ।

बल्लाळो मुरुडं विनायकमहं, चिन्तामणि स्थेवरं ||

लेण्याद्रिं गिरिजात्मकं सुरवरदं, विघ्नेश्वरम् ओज़रम् |

ग्रामे रांजण संस्थितम् गणपतिः, कुर्यात् सदा मंगलम || १ ||

गंगा सिंधु सरस्वती च यमुना, गोदावरी नर्मदा ।

कावेरी शरयू महेंद्रतनया शर्मण्वती वेदिका ।।

क्षिप्रा वेत्रवती महासुर नदी, ख्याता गया गंडकी ।

पूर्णा पूर्ण जलैः समुद्र सरिता, कुर्यातसदा मंगलम ।। २ ।।

लक्ष्मी: कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरिश्चंद्रमा: ।

गाव: कामदुधाः सुरेश्वर गजो, रंभादिदेवांगनाः ।।

अश्वः सप्त मुखोविषम हरिधनुं, शंखोमृतम चांबुधे ।

रत्नानीह चतुर्दश प्रतिदीनम, कुर्वंतु वोमंगलम ।। ३ ।।

राजा भीमक रुख्मिणीस नयनी, देखोनी चिंता करी ।

ही कन्या सगुणा वरा नृपवरा, कवणासि म्यां देईजे ।।

आतां एक विचार कृष्ण नवरा, त्यासी समर्पू म्हणे ।

रुख्मी पुत्र वडील त्यासि पुसणे, कुर्यात सदा मंगलम ।। ४ ।।

लक्ष्मीः कौस्तुभ पांचजन्य धनु हे, अंगीकारी श्रीहरी ।

रंभा कुंजर पारिजातक सुधा, देवेंद्र हे आवरी ।।

दैत्यां प्राप्ति सुरा विधू विष हरा, उच्चैःश्रवा भास्करा ।

धेनुवैद्य वधू वराशि चवदा, कुर्यात सदा मंगलम ।। ५ ।।

लाभो संतति संपदा बहु तुम्हां, लाभोतही सद्गुण ।

साधोनि स्थिर कर्मयोग अपुल्या, व्हा बांधवां भूषण ।।

सारे राष्ट्र्धुरीण हेचि कथिती कीर्ती करा उज्ज्वल ।

गा गार्हस्थाश्रम हा तुम्हां वधुवऱां देवो सदा मंगलम ।। ६ ।।

विष्णूला कमला शिवासि गिरिजा, कृष्णा जशी रुख्मिणी ।

सिंधूला सरिता तरुसि लतिका, चंद्रा जशी रोहिणी ।।

रामासी जनकात्मजा प्रिय जशी, सावित्री सत्यव्रता ।

तैशी ही वधू साजिरी वरितसे, हर्षे वरासी आतां ।। ७।।

आली लग्नघडी समीप नवरा घेऊनि यावा घरा ।

गृह्योत्के मधुपर्कपूजन करा अन्तःपटाते धारा

दृष्टादृष्ट वधुवरा न करितां, दोघे करावी उभी ।

वाजंत्रे बहु गलबला न करणे, लक्ष्मीपते मंगलम ।। ८ ।।

भारती संस्कृतीनुसार प्रत्येकाच्या घरात तुळशी वृंदावण असते. शहरी संस्कृती आणि बदलत्या नागरिककरणाने ग्रामीण संस्कृतीचा बाजही बदलला असल्याने आजकाल तुळशी वृंदावन काहीसे बाजूला ढकलले गेले आहे. पण, असे असले तरी आजही घराच्या अंगणात, ग्रील, आणि गॅलरी, गच्चीमध्ये कुंड्यांमध्ये तुळशीचे रोपटे पाहायला मिळते. त्यामुळे तुळसी विवाह घराघरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा होताना पाहायला मिळतो.