Pandharpur Ashadhi Ekadashi 2022 Special Trains: आषाढी एकादशी यात्रेसाठी लातूर, नागपूर सह या स्टेशन वरून पंढरपूर साठी मध्य रेल्वे चालवणार विशेष ट्रेन्स
Representational Image |(Photo Credits: PTI)

आषाढी वारीनिमित्तानं राज्यातील लाखो भक्त विठूरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी पंढरपुरात (Pandharpur) दाखल होतात. विदर्भ (Vidarbha), खानदेश (Khandesh) ते मराठवाड्यापासून (Marathwada) प्रत्येकालाचं आषाढी एकादशीला लाडक्या विठूरायाची ओढ पंढरीत घेवून येते. पण आता मध्य रेल्वेच्या (Central Railway) या नव्या घोषणेमुळे भक्तांचा पंढरपूर प्रवास आणखीच सोपा होणार आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातून पंढरपूरात येणाऱ्या भक्तांची संख्या मोठी असते मात्र मराठवाड्यातून प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने औरंगाबाद (Aurangabad) – पंढरपूर, जालना (Jalna) – पंढरपूर आणि नांदेड (Nanded) - पंढरपूर दरम्यान आणखी चार अतिरिक्त एकादशी विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेकडून ही रेल्वे सेवा ७ जुलै पासून सुरु करण्यात येणार असुन प्रवाशांसाठी रेल्वे स्थानकावर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, उपाहारगृह, रुग्णवाहिका, चौकशी कक्ष, संगणकीय उद्‌घोषणा कक्ष अशा सुविधा करण्यात येणार आहेत. या गाड्यांत जनरल तिकिटावर (General Tickets) वारकऱ्यांना प्रवास करता येणार आहे. गाड्यांमध्ये सामान्य प्रकारच्या डब्यांचा समावेश असणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.  ( हे ही वाचा:-Pandharpur Wari 2022: पंढरपूरच्या वारीत व्हर्च्युअली कनेक्ट राहण्यासाठी Pandharichi Wari, YouTooCanRun App अशी करेल मदत)

मध्य रेल्वेच्या आषाढी एकादशी विशेष गाड्या

मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना आणि नांदेड या शहरातून सुटणाऱ्या रेल्वेगाड्याचं वेळापत्रक (Railway Timetable) :-

 

औरंगाबाद - पंढरपूर विशेष एक्स्प्रेस

गाडी क्रमांक 07515 विशेष औरंगाबाद 9 जुलै 2022 रोजी रात्री 9.40 वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 11.30 वाजता पोहोचेल. तर, गाडी क्रमांक 07516 विशेष पंढरपूर येथून 10 जुलै 2022 रोजी रात्री 11 वाजता सुटेल आणि औरंगाबाद येथे दुसऱ्या दिवशी दुपारी 12.20 वाजता पोहोचेल.

 

जालना - पंढरपूर विशेष एक्स्प्रेस

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक 07468 जालना - पंढरपूर विशेष एक्स्प्रेस जालना येथून 9 जुलै (July) 2022 रोजी रात्री 7.20 वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 6.30 वाजता पोहोचेल. तर, गाडी क्रमांक 07469 आषाढी विशेष एक्स्प्रेस पंढरपूर येथून 10 जुलै 2022 रोजी रात्री 8.30 वाजता सुटेल आणि जालना येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता पोहोचेल.

 

नांदेड - पंढरपूर विशेष एक्स्प्रेस

गाडी क्रमांक 07498 विशेष गाडी नांदेड येथून 9 जुलै २०२२ रोजी दुपारी 3 वाजता सुटेल आणि पंढरपूरला दुसऱ्या दिवशी सकाळी 10.35 वाजता पोहोचेल. तर गाडी क्रमांक 07499 विशेष पंढरपूर येथून 10 जुलै 2022 रोजी रात्री 9.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 4.45 वाजता नांदेडला पोहोचेल.

 

आषाढी एकादशी अगदी आठवड्यावर येवून ठेपली असुन मंदीर प्रशासनाकडून  आवश्यक ती सगळी तयारी झाल्याची माहिती मंदीर विश्वस्थांकडून देण्यात आली आहे. तसेच यावर्षीच्या आषाढ एकादशी विशेष पुजेचा मान महाराष्ट्राचे नवनिर्वाचीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळणार आहे.