Santaji Maharaj Jayanti 2023: महाराष्ट्राला अनेक थोर मोठ्या संत-महात्म्यांची परंपरा लाभली आहे. संतांनी आपल्या वाणीने, लेखणीने, कर्तृत्वाने वैदिक धर्माचे, गीता धर्माचे पुनरुज्जीवन करून सर्वसामान्य लोकांना भक्तीचा मार्ग दाखवला. यातीलच एक महान संत म्हणजे संताजी जगनाडे महाराज (Shri Santaji Jagnade Maharaj), ज्यांना संताजी महाराज म्हणूनही ओळखले जाते. संताजी महाराज हे तुकाराम महाराजांचे शिष्य होते. संत श्री संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म 8 डिसेंबर 1624 रोजी महाराष्ट्र राज्यात पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यातील सुदुंब्रे या गावी झाली. येत्या शुक्रवारी संताजी महाराजांची जयंती साजरी केली जाईल.
संताजी जगनाडे हे तुकाराम महाराजांचे पट्टशिष्य होते. ते संत तुकारामांनी रचलेल्या अभंगांच्या संग्रहाचे, अर्थात तुकाराम गाथेचे लेखनिक होते. तुकारामांनी लिहिलेल्या अभंगांची गाथा ब्राम्हणांनी इंद्रायणी नदीमध्ये बुडवून नष्ट करण्याचा प्रयत्न केला. परंतु हे सर्व संताजी महाराजांना मुखोद्गत होते म्हणून त्यांनी ते पुन्हा लिहून काढले.
संताजी महाराजांचा जन्म तेली कुटुंबात झाला. घरची आर्थिक परिस्थिती उत्तम होती. घरात अध्यात्मिक व धार्मिक वातावरण होते. त्यामुळे लहानपासुनच त्यांना कीर्तनाला, भजनाला जाण्याची सवय लागली. साधारण 1640 मध्ये चाकणच्या चक्रेश्वर मंदिर संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला संताजी महाराजांनी हजेरी लावली होती. या ठिकाणी तुकारामांची भावपूर्ण रसाळ अभंगवाणी संताजींच्या कानावर पडली व तिथेच गुरु शिष्यांची भेट झाली. त्यानंतर संताजींनी तुकारामाची पाठ कधीच सोडली नाही. (हेही वाचा: Datta Jayanti Date 2023: दत्त जयंती यंदा 26 डिसेंबरला; जाणून मार्गशीर्ष पौर्णिमेची वेळ,पूजा विधी!)
तुकारामांच्या मुखातून निघणारे अभंग ते आपल्या लेखणीने टिपून घेत असत. संत तुकाराम महाराजांची गाथा जेव्हा इंद्रायणी नदीत फेकुन दिल्या. तेव्हा संताजी महाराजांनी तेरा दिवसात ती अभंग गाथा जशीच्या तशी तुकारामांच्या स्वाधीन केली. पुढे 1970 मध्ये मोगल सैन्याने हल्ला चढविला तेव्हा संताजींनी अभंगाचे गाठोडे श्री क्षेत्र सदुंबरे येथे आणून ठेवले. अशाप्रकारे संत तुकाराम महाराजांच्या विचारांना जिवंत ठेवण्याचे महान कार्य संत संताजी जगनाडे महाराजांनी केले.
संताजी महाराजांनी तेलसिंधू, शंकरदीपिका, योगाची वाट, निर्गुणाच लावण्य, प्रकाशदीप, घाण्याचे अभंग असे अनेक ग्रंथ लिहिले. संत तुकाराम वैकुंठाला गेल्यावर जीवनातील रसच गेला असे संताजी महाराजांना वाटू लागले. त्यानंतर त्यांनी 1699 साली श्रीक्षेत्रसदुंबरे येथे आपला देह ठेवला.