
Sankashti Chaturthi March 2020 Moon Rise Time: शास्त्रानुसार, पौर्णिमेनंतर कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला 'संकष्टी चतुर्थी' असे म्हणतात. मे महिन्यातील संकष्टी चतुर्थी आज रविवार, 10 मे रोजी आहे. गणेशभक्तांसाठी या दिवसाचे महत्त्व अधिक आहे. या दिवशी गणरायाची विधीवत पूजा करुन गोडाधोडाचे नैवेद्य दाखवले जाते. चंद्रोदयाच्या वेळी पूजा करुन उपवास सोडला जातो. संकष्टी चतुर्थी निमित्त अनेक गणेश मंदिरांमध्ये गणरायाच्या मुर्तीला विशेष आरास केली जाते. गणेशभक्त देखील या दिवशी मंदिरांमध्ये गर्दी करतात. मात्र कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड महिन्यांपेक्षा अधिक काळापासून संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. लॉकडाऊन सुरु होण्यापूर्वीपासूनच राज्यातील मंदिरं बंद करण्यात आली. त्यामुळे या महिन्यात देखील मंदिरात जावून गणरायाचे दर्शन घेणे शक्य होणार नाही. परंतु, घरच्या घरी गणपती बाप्पाची पूजा तुम्ही नक्कीच करु शकता.
संकष्टी चतुर्थी निमित्त गणरायाची पूजा कशी कराल?
चौरंगाखाली रांगोळी काढून त्यावर हळद कुंकू वाहा. त्यावर चौरंग ठेवून चौरंगावर लाल वस्त्र अंथरावे. त्यावर ताम्हणात गणराची मुर्ती/प्रतिमा ठेवावी. त्याला पाणी-दूधाचा अभिषेक करावा. त्यानंतर स्वच्छ कपड्याने मुर्ती/प्रतिमा पुसून घ्यावी आणि चौरंगावर मांडावी. गणरायाच्या मुर्ती शेजारी तांदळाने चंद्रकोर काढावी. त्यानंतर पाच फळं किंवा पाच केळी समोर ठेवावी. नारळ, पानाचा विडा सुपारी सह मांडावा. दिवा लावावा.
त्यानंतर प्रथम दिव्याला हळद-कुंकू वाहावे. अक्षता-फुलं वाहून नमस्कार करावा. मग गणरायाच्या मुर्ती/प्रतिमेवर हळद-कुंकू, अक्षता वाहाव्या. त्यानंतर विडा, बाजूला काढलेला तांदळाचा चंद्र, नारळ यावर हळद-कुंकू, अक्षता वाहून पूजा करावी. त्यानंतर फुलं वाहून प्रार्थना करावी. दिवा-अगरबत्ती ओवाळावी. नारळ, फळांचा नैवेद्य दाखवावा. (शक्य असल्यास त्यावर तुळशीपत्र ठेवून नैवेद्य दाखवा.) नमस्कार करुन मनोभावे प्रार्थना करावी. त्यानंतर घरी शिजवलेल्या सात्विक अन्नाचा नैवेद्य दाखवावा. आरती करावी. अखेरीस आकाशातील चंद्राचं दर्शन घ्यावं आणि उपवास सोडावा.
यंदा संकष्टी चतुर्थी दिवशी काय आहे चंद्रोदयाची वेळ?
10 मे 2020 रोजी असणाऱ्या संकष्टी चतुर्थी दिवशी रात्री 10 वाजून 13 मिनिटांनी चंद्रोदय होणार आहे. त्यामुळे त्यानंतरच उपवास करणाऱ्या भक्तांना उपवास सोडता येईल.
गणपती बाप्पा सुखकर्ता आणि दुःखहर्ता असल्याने सर्व दुःख दूर करुन आयुष्य सुखाने भरुन टाकण्यासाठी गणरायाची मनोभावे आराधना केली जाते.