Sankashti Chaturthi August 2020 (Photo Credits: Pixabay)

Sankashti Chaturthi August 2020 Moon Rise Time: पौर्णिमेनंतर कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला 'संकष्टी चतुर्थी' (Sankashti Chaturthi) असे म्हणतात. 3 ऑगस्ट रोजी पौर्णिमा झाल्यानंतर आज शुक्रवार, 7 ऑगस्ट रोजी श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी आहे. सर्व गणेशभक्तांसाठी संकष्टी चतुर्थीचा दिवस अत्यंत खास आणि महत्त्वाचा असतो. या दिवशी गणेशभक्त गणरायासोबत चंद्राची देखील पूजा करतात. त्यामुळे संकष्टी चतुर्थींच्या दिवशी चंद्रोदयाची वेळ अत्यंत महत्त्वाची असते. तसंच या वेळेनुसार गणरायाची पूजा-आरती केली जाते आणि त्यानंतरच नैवेद्य दाखवून उपवास सोडला जातो.

कोरोना व्हायरसच्या संकटामुळे अद्याप राज्यातील मंदिरे खुली करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे सर्व भाविकांना घरच्या घरी पूजा करावी लागणार आहे. आयुष्यातील संकट, विघ्न दूर करुन सुख, समृद्धी, आनंद, यश लाभावे म्हणून विघ्नहर्त्याची पूजा, प्रार्थना केली जाते.

श्रावणी शुक्रवारी आलेल्या संकष्टी चतुर्थी दिवशी काय आहे चंद्रोदयाची वेळ?

7 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजून 50 मिनिटांनी चंद्रोदय होणार आहे. त्यामुळे त्यानंतरच नैवेद्य दाखवून भाविकांना उपवास सोडता येईल.

संकष्टी चतुर्थी निमित्त गणरायाची पूजा कशी करावी?

चौरंग किंवा पाटावर लाल वस्त्र अंथरावे. गणराची मुर्ती/प्रतिमा ठेवावी. चौरंग किंवा पाटाखाली रांगोळी काढून हळद-कुंकू वाहावे. मुर्ती-प्रतिमेवर दूध-पाण्याचा अभिषेक करुन हळद कुंकू, अक्षता वाहाव्या. फुलं, दुर्वा, शमीची पाने वाहावी. दिवा, अगरबत्ती ओवाळा. पुजेसमोर पानाचा विडा ठेवून त्याचीही पूजा करावी. पाच फळे किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. संकष्टी चतुर्थी दिवशी गोडाधोडाचे जेवण करुन नैवेद्य दाखवला जातो. विशेष करुन मोदकांचा नैवेद असतो. ते शक्य नसल्यास एखादा गोडाचा पदार्थ केला जातो. त्यानंतर आरती करुन आकाशातील चंद्राचे दर्शन घेऊन मग उपवास सोडतात.

संकष्टी चतुर्थी निमित्त गणपती स्तोत्र, अथर्वशीर्ष पठण करुन गणरायाला वंदन केले जाते. श्रीगणेश आराध्य देवता असल्याने कोणतंही शुभ काम सुरु करण्यापूर्वी गणरायाची पूजा केली जाते.