
Ratha Saptami 2020: भारतीय संस्कृतीमध्ये सर्व देव-देवतांची उपासना केली जाते. त्यापैकी एक असलेल्या सूर्यदेवतेप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 'रथ सप्तमी' (Ratha Saptami) हा सण साजरा केला जातो. या दिवशी सूर्योपासना करायची असते. माघ मासातील शुक्ल सप्तमीला रथ सप्तमी साजरी केली जाते. या दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतो. या रथाला सात घोडे असतात. म्हणून 'रथ सप्तमी' असा शब्द वापरला जातो. यंदा 1 फेब्रुवारीला म्हणजेच शनिवारी रथ सप्तमी साजरी केली जाणार आहे. रथ सप्तमी हा स्त्रिया संक्रांतीनिमित्त करत असलेल्या हळदी-कुंकवाचा शेवटचा दिवस मानला जातो. पौराणिक अख्यायिकेनुसार, रथ सप्तमीच्या दिवशी सूर्य आपल्या रथावर आरूढ होतो आणि पुढील मार्गक्रमण करतो. या दिवशी सूर्याची पूजा केली जाते. रथ सप्तमी साजरी करण्यामागे धार्मिक तसेच वैज्ञानिक महत्त्व आहे. सूर्यच्या किरणांपासून मिळणारे विटामिन 'D' आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवते. या दिवसाला 'आरोग्य सप्तमी' असंही म्हटलं जातं. (हेही वाचा - Vitthal Rukmini Vivah Sohala 2020: वसंत पंचमी निमित्त पंढरपूरात रंगणार विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा; पहा खास फोटो)
रथ सप्तमी पूजाविधी -
हिंदू धर्मीयांच्या मते रथ सप्तमी हा सूर्याच्या उपासनेचा दिवस आहे. अदिती आणि कश्यप यांचा पुत्र 'सूर्य' याचा हा जन्मदिवस आहे, असे मानले जाते. या दिवशी सूर्याची पूजा केली जाते. यासाठी भक्ताने सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करावे. लाल फुले, चंदन, कापूर अर्पण करून छोट्या कलशातून सूर्याला अर्घ्य दिले जाते. असे केल्यास भक्तांना समृद्धी प्राप्त होते. या दिवसापासून सूर्यनारायण सात घोड्यांच्या रथात बसून साऱ्या आकाशाला मार्गक्रमण करतो. रथ सप्तमीच्या दिवशी तुळशीपुढे सात घोड्यांच्या रथात स्वार झालेल्या सुर्यरथाचे चित्र काढून स्त्रिया त्याची पूजा करतात. तसेच अंगणात अग्नी पेटवून भात शिजवून सूर्य देवास नैवेद्य दाखविला जातो. या दिवशी 'ॐ घृणि सूर्याय नम:' असा जप केल्यास सूर्यदेवता प्रसन्न होते, असंही म्हटलं जातं.
रथ सप्तमी मुहूर्त -
माघ शुक्लपक्ष सप्तमी प्रारंभः 31 जानेवारी 2020 (शुक्रवार) 3:50 वाजता
माघ शुक्लपक्ष सप्तमी समाप्तः 01 फेब्रुवारी 2020, (शनिवारी) 6:08 वाजेपर्यंत
रथसप्तमीचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व -
पौराणिक कथेनुसार, भगवान श्रीकृष्ण यांचा मुलगा शाम्ब याला आपल्या शारीरिक ताकदीवर खूप गर्व होता. एकदा दुर्वास ऋषी श्रीकृष्णाच्या भेटीसाठी आले होते. त्यावेळी त्यांची शारीरिक दुर्बलता बघून शाम्बने तपस्वी दुर्वास ऋषींची खिल्ली उडवली आणि त्यांचा अपमान केला. त्यामुळे दुर्वास ऋषींनी शाम्बला कुष्ठरोग होण्याचा शाप दिला. शाम्बची ही अवस्था पाहून भगवान श्रीकृष्णाने शाम्बला सूर्याची उपासना करण्यास सांगितले. सूर्याची उपासना केल्याने शाम्बची कुष्ठरोगापासून मुक्तता झाली. तेव्हापासून या दिवसाला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले. रथ सप्तमीला ज्याप्रमाणे धार्मिक महत्त्व आहे त्याचप्रमाणे वैज्ञानिक महत्तवही आहे. या दिवशी सूर्याची किरणे अंगावर पडल्याने आपले आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. सूर्याच्या किरणांमुळे शारिरिक दुर्बलता, हाडांचा कमकुवतपणा, सांधे दुखी, त्वचेचे विकार दूर होतात.