Raksha Bandhan Shubh Muhurat: बहीण-भावाचं नातं जपणारा रक्षाबंधनाचा (Raksha Bandhan) सण यंदा 15 ऑगस्ट दिवशी देशभरात साजरा केला जाणार आहे. भारतीय स्वातंत्र्यदिन आणि रक्षाबंधन हे दोन्ही सण यंदा एकत्र आल्याने सेलिब्रेशन देखील द्विगुणित होणार आहे. बहिणीच्या रक्षणासाठी भावाच्या मनगटावर राखी बांधून रक्षाबंधन म्हणजेच राखी पौर्णिमेचा सण साजरा केला जातो. मग यंदा कोणत्या वेळेत राखी बांधणं हे अधिक लाभकारक आहे, राखी बांधण्याची शुभ वेळ काय? हे नक्की जाणून घ्या. जाणून घ्या पुराणकाळात नक्की कोणी केली रक्षाबंधन सणाला सुरुवात; राखी पौर्णिमेचे काय आहे महत्व
यंदा पौर्णिमा 14 ऑगस्ट दिवशी 15:47 ते 15 ऑगस्ट दिवशी 17:59 पर्यंत आहे. त्यामुळे या काळात तुम्ही रक्षाबंधनाचा सण साजरा करू शकाल. त्यासोबतच यंदा 19 वर्षानंतर रक्षाबंधन दिवशी भद्रा नक्षत्राचा अशुभ प्रभाव दिसून येणार नाही. त्यामुळे हा दिवस अधिक खास बनला आहे.
राखी पौर्णिमा मुहूर्त
राखी बांधण्याची शुभ वेळ - सकाळी 5.54 ते संध्याकाळी 5.59 आहे.
यंदा सामान्यपणे संपूर्ण दिवस राखी पौर्णिमा साजरी करण्यासाठी शुभ आहे. मात्र राहुकाळापासून दूर राहणं लोकं अनेकदा पसंत करतात.
राहुकाळ कोणता ?
राखी पौर्णिमेदिवशी दुपारी 2.03 ते 3.41 हा राहुकाळ असल्याने या काळात राखी बांधणं टाळा.
राखी पौर्णिमा साजरी करण्याची पद्धत
भावाच्या कपाळावर कुंकवाचा टिळा लावून त्याचं औक्षण केलं जातं. त्यानंतर उजव्या हाताच्या मनगटावर रेशमी धागा/ राखी बांधली जाते. त्यानंतर बहीण भावाला गोडाचा पदार्थ भरवते. रक्षाबंधनाचा धागा हे बहीण भावाच्या प्रेमाचं प्रतिक आहे सोबतच बहीणीचं रक्षण करणं हे कर्तव्य असल्याची आठवण करून दिली जाते.
बदलत्या जीवनशैलीनुसार, आता राखी पौर्णिमेचा सण साजरा करण्याची पद्धत बदलली आहे. मात्र या सणाप्रती मूळ भावना आणि उद्देश लक्षात हा सण साजरा करा.