Maa Ashapuri Temple (संग्रहित संपादित प्रतिमा)

सध्या देशभरात सगळीकडे नवरात्रोत्सव (Navaratri 2022) मोठ्या थाटामाटात सुरु आहे. या नऊ दिवसांत देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. आपल्या देशात महिलांना देवीचे रूप मानले जाते. जिथे स्त्रियांची पूजा केली जाते, तिथे देवीचा वास असतो असे म्हणतात. परंतु बिहारमध्ये (Bihar) देवीचे असे एक मंदिर आहे, जिथे नवरात्रीच्या 9 दिवसांत महिलांच्या प्रवेशावर पूर्णपणे बंदी आहे. हे मंदिर आहे बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील माँ आशापुरी मंदिर (Maa Ashapuri Temple).

घोसरावण गावातील हे मंदिर 350 वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते. घोसरावण गावातील माँ आशापुरी मंदिरात नवरात्रीमध्ये तांत्रिक 9 दिवस सिद्धी पूजा करतात असे सांगितले जाते. या दरम्यान मंदिरात महिलांच्या प्रवेशावर पूर्ण बंदी आहे. येथे माँ दुर्गेची अष्टकोनी मूर्ती स्थापित आहे, जी माँ दुर्गेच्या नऊ रूपांपैकी एक असलेल्या सिद्धिदात्रीच्या रूपात पूजली जाते.

महिलांच्या प्रवेशामुळे तांत्रिकाचे लक्ष विचलित होऊ शकते. त्यामुळेच येथे महिलांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. ही परंपरा वर्षानुवर्षे चालू असल्याचे ग्रामस्थ सांगतात. ज्या महिला मुद्दाम मंदिरात प्रवेश करतात, त्यांच्यासोबत अप्रिय घटना घडते, असेही सांगितले जाते. मंदिराचे पुजारी पुरेंद्र उपाध्याय यांनी सांगितले की, आशापुरी आईच्या आशीर्वादाने घोसरावण, पावापुरी आणि आसपासच्या भागातील संकट येण्यापूर्वीच टळले आहे. (हेही वाचा: Kolhapur: Ambabai Temple मध्ये घटस्थापनेची विधी झाल्यावर देण्यात आली तोफेची सलामी, पाहा व्हिडीओ)

सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी येथे अचानक मातेची मूर्ती प्रगट झाल्याचे ग्रामस्थ सांगतात. राजा घोष यांना याची माहिती मिळताच त्यांनी या ठिकाणी मातेचे मंदिर बांधले. राजाने केलेल्या मंदिराच्या बांधकामामुळे त्याचे नाव घोसरवण गाव पडले. इतर दिवशी या मंदिरात पूजा करण्यास कोणावरही कसलेही बंधन नाही. मात्र नवरात्रीत दहा दिवस महिलांना येथे प्रवेश बंदी आहे. ग्रामस्थांच्या मते दहा दिवस चालणाऱ्या या पूजेचे विशेष महत्त्व मानले जाते.