
Mahatma Jyotiba Phule Marathi Quotes: ब्रिटीश सत्तेच्या कालखंडात हिंदू समाजाच्या रुढी परंपरांविरोधात अनेक सुधारकांनी आवाज उठवला. त्यापैकी एक म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. स्त्री शिक्षण, विधवा विवाह, पुनर्विवाह, संमतीवय, बालविवाह यांसारख्या ज्वलंत विषयांवर ज्योतिबा फुलेंनी समाजाला जागृत करण्याचे प्रयत्न केले. महात्मा फुले यांनी 1851 मध्ये मुलींसाठी शाळा सुरु केली. 5 हजार वर्षांच्या इतिहासातील ती मुलींसाठी पहिली शाळा होती. त्यानंतर लगेचच त्यांनी अस्पृश्यांकरीता शाळा सुरु केली. अस्पृश्य स्त्रियांकरीता त्यांनी 6 शाळा चालविल्या. 11 एप्रिल 1827 रोजी ज्योतिबा फुलेंचा जन्म झाला. तर 28 नोव्हेंबर 1890 रोजी त्यांनी या जगाला निरोप दिला. आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त जाणून घेऊया त्यांचे काही निवडक विचार. (महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त पाहा त्यांच्या जीवनावर आधारीत नाटक, ऑडिओ बुक आणि मालिका)
महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार:
स्त्री अथवा पुरुष एकंदर सर्व गावाचे , प्रांताचे , देशाचे , खंडाचे संबंधात अथवा कोणत्याही धर्मातील स्वताच्या संबंधात , स्त्री आणि पुरुष या उभयतांनी अथवा सर्व स्त्रियांनी अथवा एकमेकात एकमेकांनी कोणत्याही प्रकारची आवडनिवड (भेदभाव) न करता या भूखंडावर आपले एक कुटंब समजून एकमताने सत्यवर्तन करून राहावे. - महात्मा फुले

कोणताही 'धर्म' ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि 'चातुर्वण्य' व 'जातिभेद' ही निर्मिती मानवाचीच आहे. - महात्मा फुले

विद्येविना मती गेली ।
मतीविना नीती गेली ।
नीतीविना गती गेली ।
गतीविना वित्त गेले ।
वित्ताविना शूद्र खचले।
इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।

जे कोणी आपले कुटुंब, भाऊबंद, सगेसोयरे, इष्टमित्र आणि साथीदारांना आपल्यासह श्रेष्ट मानून इतर कोणाही स्त्री-पुरुषांस किंवा एकंदर मानव प्राण्यास पिढीजातपणे अथवा कपटाने अपवित्र किंवा नीच मानत नाहीत त्यास 'सत्यवर्तनी' म्हणावे. - महत्मा फुले
निर्मात्याने सर्व स्त्री - पुरुषांस धर्म व राजकीय स्वतंत्रता दिली आहे. एकंदर सर्व मानवी अधिकारांचे मुख्य धनी केले आहे. - महत्मा फुले

निर्मात्याने एकंदर सर्वच प्राणीमात्रांना निर्मिताना मनुष्यास जन्मतःच स्वतंत्र प्राणी म्हणून निर्मिले आहे. त्यास आपापसातील सर्व कक्कांचा उपभोग घेण्यास समर्थ बनवले आहे. - महत्मा फुले

सर्वसाक्षी जगत्पती, त्याला नकोच मध्यस्ती. - महात्मा फुले

ज्योतिबा फुले यांनी सुरु केलेली सत्यशोधक समाज ही संस्था भारतीय समाजातील क्रांतीकरीता प्रयत्न करणारी अग्रणी संस्था ठरली. समाजातील त्यांच्या भरीव कार्यामुळेच महात्मा गांधी यांनी ज्योतिबांना 'खरा महात्मा' असे म्हटले असावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर देखील फुलेंना आपले गुरु मानतात.