Maharshi Dayanand Saraswati Jayanti 2020: स्वामी दयानंद सरस्वती हे एकोणीसाव्या शतकातली एक महान युगपुरूष, धर्मसुधारक आणि समाजसुधारक होते. दयानंद सरस्वती यांनी अंधारात सापडलेल्या व दिशा हरवून बसलेल्या समाजाला आधार देण्याचं काम केलं. त्यांनी स्वातंत्र्य, स्वत्व आणि स्वाभिमान हरवून बसलेल्या भारतीयांना आत्मभान दिले. स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म गुजरातमधील टंकारा या गावी 12 फेब्रुवारी 1824 मध्ये झाला होता. त्यांचे मूळ नाव मूळशंकर होते. त्यांचे आई-वडील औदिच्य ब्राह्मण होते. दयानंद यांच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली होती. त्यांचे कुटुंबात ज्ञानाची परंपरा होती. यातील मूळशंकर म्हणजे दयानंद हा कुशाग्र बुद्धीचा संवेदनशील मुलगा होता. वयाच्या चौदाव्या वर्षी दयानंद सरस्वतीला यजुर्वेद संपूर्ण तोंडपाठ होता. त्यांच्या जीवनामध्ये असे 3 प्रसंग घडले की, त्यामुळे त्यांचे मन अस्वस्थ झाले.
यातील पहिला प्रसंग शिवरात्रीच्या दिवशी घडला. शिवमंदिरात रात्रीच्या सुमारास शिवपिंडीवर उंदीर चढला. त्यानंतर पिंडीकडून त्याचा कुठलाच प्रतिकार होत नव्हता. याअगोदर वडिलांकडून भगवान शिवाबद्दल बरेच काही ऐकले होते. मात्र, तसे होताना दिसले नाही. तसेच दुसरे प्रसंग म्हणजे बहिणीचा मृत्यू व तिसरा प्रसंग म्हणजे आपल्या चुलत्याचा मृत्यू. या सर्व प्रसंगांमुळे दयानंदांचे मन खूप दु:खी झाले. त्यांना वाटलं मलाही असचं मरण येईल. त्यामुळे मृत्यू काय आहे तसेच सत्य ज्ञानासाठी त्यांनी गृहत्याग केला. त्यानंतर दयानंद पुन्हा कधीही घरी परतले नाही. त्यांनी घर सोडले त्यावेळी त्यांचे वय केवळ 21 वर्षे होते. (हेही वाचा - Sankashti Chaturthi February 2020: संकष्टी चतुर्थी दिवशी अशी करा श्रीगणेशाच्या व्रताची तयारी; काय आहे आजची चंद्रोदयाची वेळ जाणून घ्या सविस्तर)
मूळशंकर यांनी आपल्या प्रश्नाची उत्तरं शोधण्यासाठी देशभर प्रवास केला. त्यांनी पूर्णानंद सरस्वती या महाराष्ट्रीय सन्याशाकडून संन्यास दीक्षा घेतली आणि 'दयानंद सरस्वती' हे नाव धारण केले. त्यानंतर दयानंद सरस्वती देशभरातील अनेक साधू संतांना भेटले. त्यांच्यासोबत आपल्या चर्चा करून आपल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, यात त्यांचे समाधान होत नव्हते. काही दिवसांनंतर दयानंद यांनी मथुरेतील वितराग सन्याशी स्वामी विरजानंद यांना आपलं गुरू मानलं. येथे त्यांना अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाली. विरजानंद हे अंध होते. मात्र, ते अज्ञानाच्या अंधारात बुडालेल्या जगाला ज्ञानाचा प्रकाश दाखवीत होते. विरजानंद यांनी दयानंदांना गुरुदक्षिणा म्हणून ‘लोकांना सत्य ज्ञानाचा प्रकाश द्या व देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करा,’ असा आदेश दिला.
त्यानंतर दयानंद यांनी हिंदूधर्माच्या पुनर्जीवनाचे कार्य हाती घेतले. यासाठी त्यांनी 12 वर्ष प्रवास केला. तसेच 1875 मध्ये त्यांनी 'आर्य समाजा'ची स्थापना केली. त्यांनी देव, कर्मकांड, पूजा, जातीभेद व अस्पृश्यतेविषयी समाजाचे प्रबोधन केले. 19 व्या शतकात रूढी आणि कर्मकांड यांत अडकलेल्या हिंदू धर्माला वाचवण्यासाठी दयानंदानी 'वेदाकडे वळा' असा संदेश दिला. स्वामी दयनंदाच्या तत्वज्ञानाचा लाल लचपरॉय यांच्यावर प्रभाव पडला होता. 'सत्यार्थप्रकाश' हा दयानंदाचा ग्रंथ आर्य समाजाचा बायबल मानला जातो.