संकटांचे हरण करणारा आणि विघ्नहर्ता गणेशाचे व्रत करण्यासाठी महत्त्वाचा समजला जाणारा दिवशी म्हणजे संकष्टी चतुर्थी. प्रत्येक महिन्याला कृष्ण पक्षात येणार्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी (Sankashti Chaturthi) साजरी केली जाते. एका वर्षात 12 आणि अधिकमास आल्यास 13 संकष्टी चतुर्थी असतात. गणेश भक्तांसाठी संकष्टी चतुर्थीचा दिवस अगदीच खास असतो. काही गणेशभक्त संकष्टी चतुर्थी दिवशी विघ्नहर्ता गणेशाची पूजा अर्चना करण्यासोबतच उपवास देखील करतात. या दिवशी सुख, समृद्धी , शांती यासाठी संकष्ट चतुर्थीचं व्रत करण्याची पद्धत आहे. फेब्रुवारी महिन्यातील संकष्टी चतुर्थी आज (12 फेब्रुवारी) साजरी केली जाणार आहे.
परंपरेनुसार संकष्टीचा उपवास करणारे चंद्रोदय झाल्यानंतर गणपती समोर नैवेद्य दाखवून नंतर उपवास सोडतात. मग पहा आज संकष्टी चतुर्थीचा उपवास सोडण्यासाठी पहा मुंबई मधील चंद्रोदयाची वेळ काय?
संकष्टी चतुर्थी दिवशी चंद्र दर्शन शुभ मानलं जातं. त्यामुळे दिवसभराचा उपवास हा चंद्रोदयानंतर सोडला जातो. असं केल्याने मनातील इच्छा पूर्ण होण्यास मदत होते. आज पंचांगानुसार, रात्री 9.53 मिनिटांनी चंद्रोदयाची वेळ सांगण्यात आली आहे. Happy Sankashti Chaturthi 2019 Wishes: विघ्नहर्ता गणेशाच्या संकष्टी चतुर्थीनिमित्त मराठमोळ्या ग्रीटिंग्स, SMS, Messages, GIFs, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून द्या मंगलमयी शुभेच्छा
कसे कराल या दिवशी व्रत:
संकष्टचतुर्थीचे व्रत करणाराने त्यादिवशी पाण्यात काळे तीळ टाकून त्या पाण्याने आंघोळ करावी. दिवसभर गणेश चिंतन करुन उपवास करावा. आवश्यकतेनुसार उपवासास चालणारे पदार्थ खावे. दिवसभर आपला उद्योग-धंदा करावा. आवश्यक वाटल्यास रात्री उपवास सोडण्याआधी पुन्हा आंघोळ करावी. नंतर स्वच्छ पाटावर किंवा चौरंगावर तांदूळ अथवा गव्हाची लहानशी रास करावी. त्यावर स्वच्छ पाण्याने भरलेला कलश ठेवावा; कलशाभोवती दोन वस्त्रे गुंडाळावी, त्यावर ताम्हन ठेवून त्यात "श्रीसंकष्टहर गणपतीची" स्थापना करावी. ( श्रीगणपतीची सोने, चांदी,तांबे वगैरे धातूची मूर्ती किंवा फोटो) त्याची षोडोपचारे पूजा करावी. पूजा करणा-याने अंगावर लाल वस्त्र घ्यावे. पूजेत वाहायचे "गंध-अक्षता-फ़ूल-वस्त्र" तांबड्या रंगाचे असावे.
त्यानंतर संकष्ट चतुर्थी महात्म्य वाचावे. मग गणपतीला 21 मोदकांचा नैवेद्य दाखवून गणेशाची आरती करावी आणि गणेशासमोर नतमस्तक व्हावे. त्यानंतर चंद्रोदयानंतर चंद्रदर्शन करुन चंद्राला गंध, पाणी, अक्षता, फुले वाहावी. तुम्ही उपवास सोडत असल्या कारणाने जेवणात गोड पदार्थ आणि मोदक असावेत. जेवण आटोपल्यानंतर उत्तर पूजा करुन गणेशाची मूर्ती किंवा फोटो उचलून ठेवावी. धान्य वापरात घ्यावे. पाणी तुळशीत ओतावे.
महाराष्ट्रात गणेशभक्त संकष्टी चतुर्थीचं औचित्य साधून गणरायाच्या मंदिराला भेट देतात. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराला पुण्यातील दगडूशेठ हलवाई मंदिरात भाविकांची गर्दी होते.