Maharashtra Bendur 2023: महाराष्ट्रीय बेंदूर सण, माहिती आणि महत्त्व
Maharashtra Bendur 2022 (File Image)

Bail Pola 2023: कृषीप्रधान भारतामध्ये (Agricultural India) गाय आणि बैलही पुज्यनीय. गाय ही देवता. तर बैल हा शेतकऱ्याचा जोडीदार मानला जातो. केवळ बैलच नव्हे तर सर्व पाळीव पशू हे भारताच्या कृषी परंपरेत अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यामुळे अशा या पाळीव पशुंचा खास दिवस म्हणून बेंदूर सण (Maharashtrian Bendur 2023) साजरा केला जातो. महाराष्ट्रात बेंदूर सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच बेंदूर सण (Bendur) एखाद्या खास उत्साहासारखा साजरा केला जातो.

बेंदूर सण यंदाच्या वर्षी खास आहे. कारण यंदाचा बेंदूर गुरुपौर्णिमे दिवशी आला आहे. आज गुरुपौर्णिमा आहे. त्यामुळे एकाच दिवशी दोन दोन उत्सव साजरे होताना दिसत आहेत. आषाढ महिन्यातील पहिल्या पौर्णिमेला हा सण साजरा होतो. आजच्या दिवशी म्हणजेच बेंदूर सणाला बैल औताला जुंपले जात नाहीत. बैलाला आजच्या दिवशी विशेष वागणूक मिळते. त्याला अंघोळ घातली जाते. पोळ्यांचा नैव्यद दाखवला जातो. त्याचे खांदेमळणी केली जाते. त्याला रंगीबेरंगी रंगानी रंगवले जाते आणि गाव-पांढरीतून त्याची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते. (हेही वाचा, Maharashtra Krushi Din 2023 HD Images: महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरी करा वसंतराव नाईक जयंती, HD Images, Wishes, Messages, Whatsapp Status च्या माध्यमातून द्या बळीराजाला शुभेच्छा)

बेंदूर सण हा एका प्रथेचे प्रकटीकरण आहे ज्यामध्ये सर्व पाळीव प्राणी कुटुंबाचा एक भाग म्हणून साजरे केले जातात. हा सण पावसाळ्यात येतो. जेव्हा शेतीची कामे संपलेली असतात आणि शेतकरी काहीसा विसावलेला असतो. शेतीच्या उद्देशाने वाढवलेल्या आणि ठेवलेल्या गुरांचा सन्मान करण्यासाठी, लोक दरवर्षी बेंदूर उत्सव साजरा करतात. परंपरेने शेतकऱ्याला त्यांच्या शेतीच्या कामात मदत करणाऱ्या बैलांना सजवले जाते. त्यांना विशेष अन्न दिले जाते. हा सोहळा महाराष्ट्र बेंदूर म्हणून ओळखला जातो, जो शेतकरी समुदाय मोठ्या उत्साहाने पाळतात.