ब्रह्मदेव सृष्टीचा निर्माता आहे. विष्णू सृष्टीचा पालनकर्ता तर शंकर हा तिचा संरक्षणकर्ता आहे. यामुळेच भोलेनाथाला 'कैलासनिवासी' असे म्हटले जाते. देवादीदेव महादेव असेही शिवशंकराला संबोधले जाते. अशा या देवाचे नामस्मरण करण्याचा, त्याची मनोभावे पूजा करण्याचा दिवस म्हणजे महाशिवरात्री. या दिवशी लाखो भाविक आपल्या महादेवा चरणी लीन होतात. त्यांच्या पायाी बेलपत्र वाहतात. त्याची पूजा करतात. त्याच्यासाठी उपवास करतात. ही शिवाची पूजा प्रत्येक भक्तगण आपापल्या परीने करतो. आपल्या पूजेत किंवा सेवेत कोणतीही कमतरता राहू नये यासाठी तो प्रयत्नात असतो.
मात्र अशा वेळी उत्साहाच्या भरात शंकराची पूजा करताना आपल्याकडून काही चुकीच्या गोष्टी घडू शकतात. त्यामुळे ही पूजा करताना पुढील गोष्टींचा नक्की विचारात घ्याव्यात
1. शंकराच्या पिंडीला प्रदक्षिणा घालतेवेळी ती कधीच पूर्ण करु नये. ती नेहमी अर्धवर्तुळाकारच करावी. शिवलिंगावर अर्पण केलेले पाणी, बाहेर पडणारा मार्ग कधीही ओलांडू नये. शिवलिंगावर अर्पण केलेल्या पाण्यामध्ये प्रचंड ऊर्जा आणि शक्ती सामावलेली असते. त्यामुळे हे जल लांघणे अनुचित असते. त्यामुळे प्रदक्षिणा घालताना लक्ष ठेवावे.
2. शंकराला सायंकाळी कधीही अभिषेक केला जाऊ नये, शास्त्राप्रमाणे तो नेहमी सकाळीच करावा.
3. बेलपत्राशिवाय कोणताही गोष्ट शिवलिंगावर अर्पण करू नये. फूले, नैवेद्य हा शिवलिंगासमोर अर्पण करावा. शिवलिंगावर अर्पण केलेला नेवैद्य ग्रहण केला जात नाही, अशी मान्यता आहे. हा पूजेतील दोष समजला जातो. Maha Shivratri 2020: मेष ते मीन राशीनुसार तुम्ही असा कराल शंकराला अभिषेक तर पूर्ण होऊ शकतील तुमच्या सर्व मनोकामना
4. शिवपूजनावेळी चुकूनही शंखाचा वापर करू नये. शंकराने शंखचूड नामक दैत्याचा वध केला होता आणि शंख हा त्याचा अंश मानला जातो. त्यामुळे शंकराची पूजा करताना शंखाचा वापर टाळावा.
5. शंकराची पूजा करताना भंग पावलेल्या अक्षतांचा वापर करु नये. त्या नीट पारखून घ्याव्यात.
6. शिवपूजन करताना केसर, दुपहरिका, मालती, चम्पा, चमेली, जुई या फुलांचा वापर करू नये. याऐवजी बेलाची पाने, भांगाची पाने, धोत्र्याची पाने, घोंगलाची पाने, निळी कमळे, अशोकाची पाने, आवळीची पाने, कण्हेरीची पाने, कदंबाची पाने, ब्राह्मीची पाने, आघाडाची पाने शिवशंकराला शिवपूजनावेळी वाहावीत.
शिवपूजनाला वरील गोष्टी शक्यतो टाळाव्यात. शंकरांचे व्रत करताना कोणतीही चुकीची गोष्ट आपल्याकडून घडू नये याची काळजी घ्यावी आणि सर्वात महत्त्वाचे तुमच्या हातून घडणारे सत्कार्य हे देखील शंकराला प्रियच असते. म्हणून सत्कार्य करा आणि आपल्यातील वाईट गोष्टींना काढून टाका.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. लेटेस्टली मराठी यातुन कोणतीही अंधश्रद्धा पसरवू इच्छित नाही.)