Kinkrant 2024: मकर संक्रांती नंतर दुसर्‍या दिवशी येणार 'किंक्रांत' काय असते?
kinkrant | File Image

भारतामध्ये आज नववर्षातला पहिला सण अर्थात मकर संक्रांती (Makar Sankranti) साजरी केली जात आहे. यंदा लीप इयर असल्याने मकर संक्रांत 15 जानेवारीला आहे. संक्रातीच्या दुसरा दिवस हा किंक्रांत (Kinkrant) म्हणून साजरी केली जाते. आख्यायिकेनुसार, संक्रांतीदेवीने संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला. म्हणून त्या राक्षच्या नावाने किंक्रांत म्हणून हा दिवस पाळला जातो. किंक्रांतीला करिदिन असंही म्हटलं जातं. दक्षिण भारतात किंक्रांतीचा दिवस 'मट्टू पोंगल' (Mattu Pongal) म्हणून साजरा करतात.

किंक्रांतीचा दिवस हा अनेकजण अशुभ मानतात. या दिवशी शुभ कार्य करणं टाळलं जातं. या दिवशी विवाहित स्त्रिया संक्रांतीप्रमाणे हळदी कुंकू कार्यक्रम करू शकतात. प्रत्येक राज्यानुसार किंक्रांती बाबत वेगवेगळ्या रूढी परंपरा पाळल्या जातात. Makar Sankranti 2024 Ukhane: मकर संक्रांती आणि हळदी कुंकूच्या कार्यक्रमासाठी खास मराठी उखाण्यांची यादी .

महिला संक्रांतीपासून रथसप्तमी पर्यंत हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करतात. यामध्ये महिला सहभागी होऊन एकमेकींना तिळगूळ, फूटाणे, वाण देतात. तर संक्रांतीला हमखास काळे कपडे परिधान करून हा सण साजरा केला जातो. लहान मुलांचेही बोरन्हाण केले जाते. नवदांपत्यांसाठी पहिली संक्रांत खास असते. ते काळ्या कपड्यांसोबत हलव्याचे दागिने देखील परिधान करतात.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. याद्वारा कोणतीही अंधश्रद्धा पसरवणं हा लेटेस्टली मराठी चा हेतू नाही)