Guru Purnima 2022 Date: गुरु पौर्णिमा यंदा 13 जुलै दिवशी, जाणून घ्या तिथी वेळ, महत्त्व !
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा (Photo Credits-File Image)

आषाढ पौर्णिमेचा दिवस व्यास पौर्णिमा म्हणजेच गुरू पौर्णिमा (Guru Purnima) म्हणून साजरा केला जातो. यंदा ही गुरू पौर्णिमा 13 जुलै दिवशी साजरी केली जाणार आहे. हिंदू धर्मानुसार, गुरू पौर्णिमेला आपल्या आयुष्यात गुरूतुल्य असणार्‍या व्यक्तिमत्त्वांप्रति आदरांजली अर्पण करायची असते. आजही कला क्षेत्रात गुरू पौर्णिमा हा दिवस विशेष साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्ताने हातात गंडा बांधला जातो. नव्याने शिष्य स्वीकारले जातात. तर या दिवशी काही शिष्य आपली कला देखील सादर करून गुरूंना मानवंदना देतात. कला क्षेत्राप्रमाणे इतर क्षेत्रातही आपल्याला घडवणार्‍या व्यक्तींप्रति आदर व्यक्त करण्याचा हा दिवस आहे.

वेद व्यास यांनीच दिवशीसनातन धर्माचे चार वेद स्पष्ट केले. या व्यतिरिक्त त्यांना श्रीमद् भागवत, महाभारत, ब्रह्मसूत्र, मीमांसा व्यतिरिक्त 18 पुराणांचे लेखक मानले जाते आणि त्यांना आदिगुरूंच्या नावाने संबोधले जाते. धर्मग्रंथात भगवंतांपेक्षा गुरुच्या स्थानास उच्च स्थान देण्यात आले आहे, म्हणून गुरु पौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूची विशेष उपासना करण्याचा नियम आहे.

आषाढ पौर्णिमा 2022 तिथी वेळ

आषाढ पौर्णिमा प्रारंभ: 12 जुलै 7.48

आषाढ पौर्णिमा समाप्ती: 14 जुलै 00:08

अशी करा गुरु पौर्णिमा दिवशी पूजा

  • सकाळी लवकर उठा आणि घर साफ करा.
  • स्नान करून सर्व कामे आटोपून घ्या.
  • एखाद्या पवित्र ठिकाणी पाटावर सफेद वस्त्र अंथरून त्यावर पूर्वात्तर (पूर्व-पश्चिम) किंवा दक्षिणोत्तर (दक्षिण-उत्तर) गंधाने बारा-बारा रेघा ओढून व्यासपीठ तयार करा.
  • त्यापूर्वी 'गुरूपरंपरासिद्धयर्थ व्यासपुजा करिष्ये' मंत्र जप करा.नंतर दहाही दिशांना अक्षता टाका.*आता ब्रम्हा, व्यास, शुकदेव, गोविंद स्वामी आणि शकराचार्यांच्या नावाने मंत्र पूजा करा.
  • नंतर आपले गुरू किंवा त्यांच्या प्रतिमेची पूजा करून त्यांना दक्षिणा द्या.

(टीप: सदर लेख केवळ माहिती देण्याच्या उद्देश्याने लिहण्यात आलेला आहे.  लेटेस्टली मराठी या मजकूराची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा कोणताही उद्देश नाही.)