
नाताळचा सण आला की हमखास वाजणारी एक धून म्हणजे 'जिंगल बेल्स (Jingle Bells)'. पण हे गाणं खरं तर ख्रिस्मस साठी नव्हे तर थॅक्स गिव्हिंग़ साठी लिहण्यात आले होते. 1857 मध्ये जेम्स लॉर्ड पिअरपॉईंट (James Lord Pierpont) ने हे गाणं One Horse Open Sleigh नावाने पब्लिश केलं होतं. हे गाणे एका रोमांचक स्नो राईडची कहाणी सांगते. या गाण्याचा ख्रिसमसशी काहीही संबंध नव्हता. कालांतराने हे गाणे ख्रिसमसशी जोडले गेले आणि आज ते जगभरात एक प्रमुख ख्रिसमस कॅरोल म्हणून गायले जाते.
‘जिंगल बेल्स’ ची कहाणी
पियरपॉइंटने हे गाणे 1850 मध्ये मेडफोर्ड, मॅसॅच्युसेट्स येथे लिहिले होते असे मानले जाते. जिथे त्याने ते एका मधुशाळेत बसून रचले होते. आता या ठिकाणी एक चष्म्याचे दुकान आहे, ज्याच्या भिंतीवर 'जिंगल बेल्स कम्पोज्ड हिअर' असे लिहिलेला एक फलक आहे. पण प्रकरण इथेच संपत नाही. पियरपॉइंट नंतर जॉर्जियातील सवाना येथे स्थलांतरित झाला, जिथे एका चर्चच्या बाहेर असलेल्या फलकावर दावा करण्यात आला होता की हे गाणे तिथे लिहिले गेले आहे. एवढेच नाही तर 2017 मध्ये, थिएटर इतिहासकार कियाना हॅमिल यांनी त्यांच्या संशोधनात सांगितले की, त्यावेळी पियरपॉइंट कॅलिफोर्नियामध्ये होता आणि गोल्ड रशमध्ये आपले नशीब आजमावत होता.
3800 लोकांनी 'जिंगल बेल्स' गायलं
वाद असूनही, मेडफोर्डच्या लोकांनी 'जिंगल बेल्स' अभिमानाने स्वीकारले आहे. दरवर्षी येथे 'जिंगल बेल्स फेस्टिव्हल' आयोजित केला जातो ज्यामध्ये हजारो लोक जमतात. 2004 मध्ये, सुमारे 3800 लोकांनी हे गाणे एकत्र गायले आणि एक जागतिक विक्रम रचला. 'जिंगल बेल्स' चा इतका खोलवर प्रभाव पडला की 1965 मध्ये जेव्हा जेमिनी 6 च्या अंतराळवीरांनी ते एक प्रॅन्क म्हणून गायले तेव्हा ते अंतराळातूनही वाजवले गेले.
ख्रिसमस आणि हिवाळ्याच्या काळात 'जिंगल बेल्स' अजूनही सर्वत्र हमखास गायलं जातं त्याची एक क्रेझ आहे. हे गाणे नेहमीच आपल्या हृदयात खास स्थान ठेवेल.