Dnyaneshwari Jayanti (Photo Credits: Wikimedia Commons)

 729th Birth Anniversary Of Dnyaneshwari:   संत ज्ञानेश्वर (Sant Dnyaneshwar) रचित 'ज्ञानेश्वरी' हा वारकरी पंथीयांसह सामान्यांसाठी एका महत्त्वाच्या ग्रंथांपैकी आहे. भाद्रपद महिन्यात कृष्ण पक्ष षष्ठी दिवशी ज्ञानेश्वरी जयंती (Dnyaneshwari Jayanti) साजरी केली जाते. यंदा ज्ञानेश्वरी जयंती 20 सप्टेंबर 2019 दिवशी साजरी केली जाणार आहे. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ भावार्थदीपिका (Bhavarth Deepika) म्हणून देखील ओळखला जातो. सामान्यांना भगवतगीतेतील अध्यायांचे आणि त्याच्या शिकवणीचे साध्या, सरळ आणि सोप्या भाषेत आकलन व्हावं याकरिता ज्ञानेश्वरांनी 'ज्ञानेश्वरी' हा ग्रंथ लिहला. हा ग्रंथ संत ज्ञानेश्वर यांनी 1290 साली लिहला. त्याच्या स्मरणार्थ 'ज्ञानेश्वरी जयंती' साजरी केली जाते.

ज्ञानेश्वरीमध्ये एकूण 18 अध्याय आहेत. गीतेवर आधारित हा ग्रंथ मराठी भाषेतील सर्वश्रेष्ठ ग्रंथ म्हणून ओळखला जातो. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे या गावातील मंदिरात एका खांबाला टेकून भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरांनी जे भाष्य केले त्याला ज्ञानेश्वरी किंवा भावार्थदीपिका म्हटले जाते. ज्ञानेश्वरांनी दिलेली माहिती सच्चिदानंद महाराजांनी लिहून घेतल्याचं म्हटलं जातं. इतर भाषिकांदेखील ज्ञानेश्वरी आणि त्यामधील आशय समजावा याकरिता इतर प्रादेशिक भाषा आणि इंग्रजी मध्ये त्याचे भाषांतर करण्यात आले आहे.

ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या लिखाणाला यंदा 729 वर्ष पूर्ण होणार आहेत. त्यानिमित्ताने दरवर्षी नेवासे येथील ज्ञानेश्वर मंदिरामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. प्रबोधनपर, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून ज्ञानेश्वर जयंती साजरी केली जाते. सनातन धर्माची शिकवण आणि उपदेश सामान्यांपर्यंत पोहचवण्यसाठी संत ज्ञानेश्वर यांनी भरीव कामगिरी केली आहे.