Deep Amavasya 2022 Date: दीप अमावस्या यंदा 28 जुलै दिवशी जाणून घ्या दीप पूजेचे महत्त्व!
दीप अमावस्या (Photo Credits-File Image)

आषाढ अमावस्येचा (Ashadha Amavasya 2022 ) दिवस हा दीप अमावस्या (Deep Amavasya) म्हणून साजरी करण्याची प्रथा आहे. यंदा ही दीप अमावस्या 28 जुलै दिवशी साजरी केली जाणार आहे. दीप अमावस्ये दिवशी स्त्रिया घरातील दिवे स्वच्छ करून एकत्र मांडतात. या दिव्यां भोवती रांगोळी घालून ते प्रज्वलित करून त्यांची पूजा करण्याची रीत आहे. दीपपूजन केल्याने घरात धन धान्य व लक्ष्मीचा वास राहतो अशी लोकांची श्रद्धा आहे. पूर्वीच्या काळी विद्युत दिवे नव्हते पावसाळयात घरात जास्त अंधार होतो, घरातील दिवे सुस्थितीत असावेत. त्यांची देखभाल केली जावी म्हणून कदाचित ही रीत पाळली जात असावी असा अंदाज वर्तवला जातो.

आषाढ अमावस्येनंतर हिंदू धर्मीयांचा पवित्र महिना श्रावण महिन्याची सुरूवात होते. यंदा हा श्रावण मास 29 जुलैपासून शनिवार 27 ॲागस्ट 2022 पर्यंत पाळला जाणार आहे. त्यामुळे या पवित्र महिन्याच्या पूर्वसंध्येला दीप अमावस्या साजरी करण्याची जुनी परंपरा आहे. नक्की वाचा: Shravan Month 2022 in Maharashtra: महाराष्ट्रात श्रावणमासारंभ 29 जुलै पासून; श्रावणी सोमवार व्रत, मंगळागौर सह या पवित्र महिन्यातील सण, व्रतांच्या जाणून घ्या तारखा.

दीप अमावस्या 2022 तारीख, तिथी वेळ

यंदा आषाढ महिन्यात अमावस्येची सुरूवात 27 जुलै दिवशी रात्री 9 वाजून 11 मिनिटांनी होणार आहे. तर अमावस्येची समाप्ती 28 जुलै दिवशी रात्री 11 वाजून 24 मिनिटांनी होणार आहे. त्यामुळे दीप अमावस्या 28 जुलै दिवशी साजरी केली जाणार आहे.

दीप अमावस्येला दिव्यांचं पूजन करून संध्याकाळी श्लोक म्हटले जातात. तिमिराकडून तेजा कडे नेणारा दिवा हा हिंदू धर्मामध्ये कायमच पूजनीय राहिला आहे. या दिव्याची पूजा करून अधर्माकडून धर्माकडून, दु:खाकडून सुखाकडे प्रवास व्हावा अशी मनोकामना केली जाते.

(टीप: सदर लेख केवळ माहिती देण्याच्या उद्देश्याने लिहण्यात आलेला आहे.  लेटेस्टली मराठी या मजकूराची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा कोणताही उद्देश नाही.)