Shri Vitthal Rukmini Mandir (Photo Credit Instagram)

आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi 2020) म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानण्यात येतो. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे. आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठलनामाचा गजर करीत, पंढरपुरला (Pandharpur) पायी चालत जातात, यालाच पंढरपूरची वारी (Pandharpur Wari 2020) किंवा आषाढी वारी म्हणतात. यंदा 1 जुलै रोजी आषाढी एकादशी साजरी करण्यात येणार आहे. मात्र कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच आषाढी वारी रद्द करण्यात आली आहे. आज ज्ञानेश्वर माऊली, जय हरी विठ्ठल आणि टाळ-मृदुंगाच्या गजरात, मानाच्या 9 पालख्या एस. टी बसने पंढरपूरकडे रवाना झाल्या आहेत.

दरम्यान आषाढी एकादशीचे औचित्य साधून, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने, आज श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिराच्या गाभाऱ्यास शोभेच्या जांभळ्या, पांढऱ्या व गुलाबी रंगाच्या फुलांनी सुंदर अशी सजावट करण्यात आली. सध्या सोशल मीडियावर या गाभाऱ्याचे फोटो व व्हिडिओ व्हायरल होत आहेत. अतिशय मनमोहक अशी ही सजावट पाहून कोणाचेही मन भरेल. यावर्षी आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरला जाणे शक्य नसल्याने, लेटेस्टली मराठीच्या वाचकांसाठी आम्ही हे फोटो व व्हिडिओ घेऊन आलो आहोत.

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शासनाने पायी पालखी नेण्यास प्रतिबंध केल्याने संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आज सकाळी त्र्यंबकेश्वर येथून शिवशाही बसने पंढरपुरकडे रवाना झाली. संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे विठाई बसमधून पंढरपूरकडे प्रस्थान झाले. औरंगाबादमध्ये संत एकनाथ महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा पार पडला. दरम्यान, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहकुटुंब पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. बुधवारी आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्र्याच्या हस्ते महापूजा केली जाणार आहे. (हेही वाचा: आषाढी एकादशी दारापुढे 'या' सुरेख रांगोळ्या काढून विठूरायाला करा प्रसन्न, Watch Videos)

वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक एक पदयात्रा होय. वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. 13 व्या शतकात या वारीचा उल्लेख आढळतो. संतश्रेष्ठ ज्ञानदेवांच्या घराण्यात पंढरीच्या वारीची परंपरा होती. त्यानंतर ज्ञानदेवांनी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन सर्व जातीपातींच्या समाजाला एकत्रितपणे या सोहळ्यात सामील करून घेतले. पुढे एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, मल्लप्पा वासकर यांसारख्या संतांनी वारीची परंपरा चालवली व जपली.