April 2021 Festival Calendar: यंदा एप्रिल महिन्यात गुड फ्रायडे, गुढी पाडवा, राम नवमी ते हनुमान जयंती पहा कोणत्या दिवशी?
April Calendar 2021| Photo Credits: File Photos

मागील वर्षभर कोरोनाच्या संकटामुळे सणवार घरातच राहुन साजरे करावे लागले आहेत. आता या जागतिक आरोग्य संकट आणि भारतातील कोविड 19 संकटाला वर्ष उलटलं. लस आली पण स्थिती अजूनही चिंताजनकच आहे. यंदा एप्रिल महिन्यात हिंदू धर्मीयांसाठी विशेष महत्त्व असलेल्या गुढी पाडवा(Gudi Padwa), राम नवमी (Ram Navami), हनुमान जयंती (Hanuman Jayanti) सारखे महत्त्वाचे सण, चैत्र नवरात्रीसारखे व्रत वैकल्याचे दिवस आहेत. ख्रिस्ती बांधवांचा गुड फ्रायडे(Good Friday), ईस्टर संडे (Easter Sunday) आहे. तर बौद्ध बांधवांसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा दिवस आहे. पण हे सारे सण कोरोनाच्या सावटाखालीच साजरे होण्याची शक्यता आहे. मग पहा या एप्रिल 2021 मध्ये हे सारे महत्त्वाचे सण आणि व्रत वैकल्यं पहा कोणत्या दिवशी आहेत. April Fool Day 2021: एप्रिल फूल म्हणजे काय? हा दिवस साजरा करण्यास कधीपासून झाली सुरुवात? जाणून घ्या.

 

एप्रिल महिन्यात 2 एप्रिलला गुड फ्रायडे पासून सण सुरू होणार आहेत तर 30 एप्रिलला संकष्टी चतुर्थी आहे. मग या महिन्याभराच्या काळात पहा कोण कोणते सण येणार आहेत?

एप्रिल 2021 मधील सण-उत्सव व व्रत वैकल्य यादी

2 एप्रिल - गुड फ्रायडे

2 एप्रिल - रंगपंचमी

4 एप्रिल - ईस्टर संडे

7 एप्रिल - पापमोचनी एकादशी

13 एप्रिल - गुढी पाडवा

13 एप्रिल - चैत्र नवरात्र प्रारंभ

14 एप्रिल - डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती

21 एप्रिल - राम नवमी

21 एप्रिल - चैत्र नवरात्री समाप्ती

25 एप्रिल - महावीर जयंती

27 एप्रिल - हनुमान जयंती

30 एप्रिल - संकष्टी चतुर्थी

एप्रिल महिना हा आर्थिक नववर्षाचा महिना असतो. उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्याने या महिन्यात बच्चेकंपनीला शाळेला सुट्टी असते. पण यंदा मुलांच्या या सुट्ट्या देखील घरात राहूनच जाणार आहेत. कोरोनाचा दिवसागणिक वाढणारा आकडा हा मनात धडकी भरवणारा आहे. पण त्यामुळेच लोकांनी काळजी घेणं आवश्यक आहे. दरवर्षी हिंदू धर्मीयांचं नववर्ष अर्थात पाडव्याचा सण मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. गुढी पाडव्यानिमित्त गल्लोगल्ली गुढ्या उभारून शोभायात्रा काढल्या जातात पण यंदा या सार्‍यांवर निर्बंध कायम राहण्याची शक्यता आहे. सध्या राज्यांत कोविड 19 चं संक्रमण पाहता रात्री 8 नंतर नाईट कर्फ्यू 15 एप्रिल पर्यंत लागू आहे.