
Marathwada Liberation Day 2025: दरवर्षी १७ सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. भारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला, पण त्यावेळी देशातील अनेक संस्थाने भारतात विलीन झाली नव्हती. त्यापैकीच एक होते हैदराबाद संस्थान. हैदराबादच्या निजामाने मराठवाड्याला तब्बल १३ महिने स्वातंत्र्यापासून वंचित ठेवले होते. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाल्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले. परंतु, हैदराबादचा निजाम मीर उस्मान अली खान याला हैदराबादला एक वेगळे राष्ट्र बनवायचे होते. हैदराबाद संस्थानामध्ये महाराष्ट्रातील ८ जिल्ह्यांचा (मराठवाडा), तसेच आंध्र प्रदेश आणि कर्नाटकाच्या काही भागांचा समावेश होता. निजामाने लोकांना स्वातंत्र्याच्या प्रवाहापासून दूर ठेवण्यासाठी अत्याचार सुरू केले.
स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मुक्तिसंग्रामाची मशाल पेटली
निजामाच्या अत्याचारी राजवटीविरोधात नागरिकांनी संघर्ष सुरू केला. स्वामी रामानंद तीर्थ यांनी या लढ्याचे नेतृत्व केले आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठी मराठवाड्याच्या जनतेला एकत्र केले. निजाम भारताशी चर्चा करण्यास तयार नव्हता. त्यामुळे, अखेर भारत सरकारने 'ऑपरेशन पोलो' (Operation Polo) ही मोठी कारवाई करण्याचा निर्णय घेतला.
१३ सप्टेंबर १९४८ रोजी भारतीय लष्कराने निजामाच्या सैन्यावर चौफेर हल्ला चढवला. भारतीय सैन्याच्या शौर्यापुढे निजाम जास्त काळ टिकू शकला नाही. अखेर १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाने शरणागती पत्करली आणि हैदराबाद संस्थानाचे भारतात विलीनीकरण झाले. याच दिवशी मराठवाड्यालाही स्वातंत्र्य मिळाले.
१७ सप्टेंबरचा दिवस 'मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन' म्हणून का साजरा करतात?
मराठवाड्याच्या जनतेसाठी १७ सप्टेंबर हा खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यदिन ठरला. याच दिवसाची आठवण म्हणून मराठवाड्याचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी हा दिवस 'मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन' म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. मराठवाड्याच्या स्वातंत्र्यलढ्याचा हा गौरवशाली इतिहास चिरंतन राहावा, यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये 'मुक्ती स्तंभ' उभारण्यात आला आहे.