Devendra Fadnavis, Julia Evelyn Morley, Karolina Bielawska (संग्रहित संपादित प्रतिमा)

यंदाची विश्वसुंदरी स्पर्धा म्हणजेच, मिस वर्ल्ड स्पर्धा 2023 (Miss World 2023) भारतात होणार आहे. आज मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनने 71 व्या मिस वर्ल्ड स्पर्धेबाबत माहिती देताना, 2023 च्या सौंदर्य स्पर्धेसाठी यजमान देश म्हणून भारताची निवड जाहीर केली. भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, विविधतेला चालना देण्याची बांधिलकी आणि महिला सशक्तीकरणाची तळमळ लक्षात घेऊन हा प्रतिष्ठित सन्मान देशाला देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे संस्थेने सांगितले.

भारतातील 71 वी मिस वर्ल्ड 2023 स्पर्धा अनेक परोपकारी उपक्रमांद्वारे परोपकाराला प्रोत्साहन देईल आणि स्पर्धकांना त्यांच्या समुदायांवर सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी आणि समाजात योगदान देण्यासाठी प्रेरित करेल. आता तब्बल 27 वर्षानंतर ही स्पर्धा पुन्हा भारतामध्ये होणार आहे. मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या चेअरपर्सन आणि सीईओ ज्युलिया मोर्ले यांच्यासह सध्याची मिस वर्ल्ड कॅरोलिना बिएलॉस्का यांनी गुरुवारी नवी दिल्लीतील उद्घाटन पत्रकार परिषदेला हजेरी लावली.

संस्थेच्या अध्यक्षा आणि सीईओ ज्युलिया मोर्ले म्हणाल्या, ‘मला हे सांगताना खूप आनंद होत आहे की, 71 वी मिस वर्ल्ड फायनल भारतामध्ये होणार आहे. यावेळी 130 हून अधिक देशांतील स्पर्धक त्यांची प्रतिभा, बुद्धिमत्ता आणि संवेदनशीलता दाखवण्यासाठी भारतात एकत्र येतील.’ या स्पर्धेमध्ये टॅलेंट शो, क्रीडा आव्हाने आणि धर्मादाय उपक्रम यांचाही समावेश असेल. (हेही वाचा:  राजस्थानची Nandini Gupta ठरली यंदाची 'मिस इंडिया'; 19 वर्षीय नंदिनी बद्दल इथे घ्या जाणून)

साधारण नोव्हेंबर/डिसेंबर 2023 मध्ये नियोजित असलेल्या अंतिम फेरीपूर्वी स्पर्धकांना शॉर्टलिस्ट करण्यासाठी अनेक फेऱ्या आयोजित केल्या आहेत. एक महिना या सर्व फेऱ्या चालतील. दरम्यान, भारताने शेवटची मिस वर्ल्ड स्पर्धा 1996 मध्ये बेंगलोर येथे आयोजित केली होती. याआधी भारतामधील रिटा फारिया (1966), ऐश्वर्या राय (1994), डायना हेडन (1997), युक्ता मुखी (1999), प्रियांका चोप्रा (2000) आणि मानुषी छिल्लर (2017) अशा 6 महिलांनी मिस वर्ल्डचे प्रतिष्ठित विजेतेपद पटकावले आहे.