धक्कादायक! बिजनोर येथे महिलेला बाजेला बांधून जाळले; पीडितेवर बलात्कार झाल्याचा उत्तर प्रदेश पोलीसांना संशय
Representational images (PC - File Photo)

उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) महिलेला बाजेला (कॉट) बांधून जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशच्या बिजनोरच्या (Bijnor) गजरोल गावाजवळ ही घटना घडली आहे. पोलिसांनी वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार, बलात्कारानंतर महिलेची हत्या करण्यात आली. त्यानंतर तिला जाळण्यात आले. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

बिजनोरमध्ये शिव आणि झलरा गावाच्यामध्ये नोएडा येथे राहणाऱ्या विश्वंभर यांची आंब्याची बाग आहे. या बागेत शुक्रवारी संध्याकाळी गावातील गजंफर अली यांनी एका खाटेसह एका महिलेला जीवंत जाळल्याचे पाहिले. त्यानंतर त्यांनी ताबडतोब पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. अद्याप मृत महिलेची ओळख पटलेली नाही. महिलेला जाळण्यात आले त्या ठिकाणी पोलिसांना जिवंत काडतूस सापडले. त्यामुळे महिलेची गोळी घालून हत्या करण्यात आल्याचा अंदाजही पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. (हेही वाचा - भारतात दोनच मुलं जन्माला घालण्यासंबंधीचा कायदा असणं गरजेचं - सरसंघचालक मोहन भागवत)

महिलेला जाळण्यात आल्याने तिची ओळख पटणे कठीण झाले आहे. मृत महिला बाजेला बांधून जाळण्यात आले. हे सर्व कृत करण्याअगोदर महिलेवर बलात्कार करण्यात आला असावा, असा अंदाजही पोलिसांनी वर्तवला आहे. या घटनेची अधिक चौकशी पोलिस करत आहेत. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथे एका महिलेवर बलात्कार करून तिला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यात पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.