Weekend Curfew in Delhi: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सध्या सुरू असलेल्या कोरोना साथीच्या अराजक दरम्यान परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शुक्रवारी रात्री 10 ते सोमवारी सकाळी 6 या वेळेत दिल्लीत शनिवार व रविवार कर्फ्यूची घोषणा केली आहे. शहरातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर केजरीवाल यांनी उपराज्यपाल अनिल बैजल यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत विकेंड कर्फ्यूची घोषणा केली आहे. विकेंड कर्फ्यू दरम्यान, मॉल, स्पा, जिम, सभागृह इत्यादी ठिकाण बंद राहतील, परंतु सिनेमा हॉल 30 टक्के क्षमतेसह सुरू असतील.
यासंदर्भात बोलताना केजरीवाल यांनी सांगितलं की, झोननिहाय साप्ताहिक बाजाराला परवानगी दिली जाईल. साप्ताहिक बाजारपेठेतील गर्दी कमी व्हावी यासाठी विशेष व्यवस्था केली जात आहे. रेस्टॉरंटमध्ये यापुढे बसण्याची आणि खाण्याची परवानगी दिली जाणार नाही, फक्त होम डिलिव्हरीला परवानगी असेल. केवळ अत्यावश्यक सेवा आणि विवाहसोहळ्यांशी संबंधित लोकांना कर्फ्यू पास देण्यात येईल. (वाचा - Coronavirus In India: भारतामध्ये 24 तासांत कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये उच्चांकी वाढ; पहिल्यांदाच 2 लाखांच्या पार नव्या कोरोनाबाधितांचे निदान)
दिल्लीतील रुग्णालयांमध्ये खाटांची कमतरता नाही. सध्या 5,000 हून अधिक बेड रिकामे आहेत. दिल्लीतील सर्व रुग्णांना उपचार आणि बेड मिळू शकतील, असा आमचा प्रयत्न आहे. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी बुधवारी सांगितलं होत की, राजधानीत कोविड च्या घटनांमध्ये दररोज झपाट्याने वाढ होत आहे. राजधानीत कोरोना संसर्ग वाढत आहे. शहरातील विविध रूग्णालयात बेडची संख्या वाढविण्यात आली आहे. याशिवाय दिल्ली सरकारने पुन्हा केंद्राला रुग्णालयांमध्ये बेडची संख्या वाढविण्यासंदर्भात विनंती केली आहे, असंही जैन यांनी सांगितलं.
To control the spread of COVID19, it has been decided to impose weekend curfew in Delhi: Chief Minister Arvind Kejriwal pic.twitter.com/4oc4kFMBLG
— ANI (@ANI) April 15, 2021
दरम्यान, बुधवारी दिल्लीत कोरोना विषाणूच्या प्रकरणात मोठी वाढ झाली. काल दिल्लीत 17,000 पेक्षा जास्त नवीन प्रकरणे नोंदली गेली तसेच 104 लोकांचा मृत्यू झाला. दिल्लीच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, बुधवारी 17,282 नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे दिल्लीतील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 7,67,438 इतकी झाली आहे.