RP Ravichandran (PC - ANI)

Rajiv Gandhi Assassination: 11 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने राजीव गांधींच्या (Rajiv Gandhi) मारेकऱ्यांना सोडण्याचे आदेश दिले. राजीव गांधी हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या नलिनी आणि आरपी रविचंद्रन ( RP Ravichandran) यांच्यासह सहा आरोपींची सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुटका करण्यात आली. त्यानंतर काल म्हणजेच 12 नोव्हेंबर रोजी त्यांची तुरुंगातून सुटका झाली. दोषी रॉबर्ट पायस आणि जयकुमार यांची पुझल सेंट्रल जेलमधून तर मुरुगन आणि संथन यांची वेल्लोर सेंट्रल जेलमधून सुटका करण्यात आली.

तुरुंगातून सुटका होताच गुन्हेगारांची प्रतिक्रियाही समोर आली आहे. यातील आरपी रविचंद्रन माध्यमांशी बोलताना म्हणाले की, "उत्तर भारतातील लोकांनी आमच्याकडे दहशतवादी किंवा खुनी याऐवजी पीडित म्हणून पाहिले पाहिजे. आम्ही दहशतवादी आहोत की स्वातंत्र्य सैनिक हे काळच ठरवेल. लोक आम्हाला दहशतवादी मानत असले तरीही आम्हाला खात्री आहे की, काळ आम्हाला निर्दोष सिद्ध करेल." (हेही वाचा - Rajiv Gandhi Assassination Case: मी दहशतवादी नाही; तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राजीव गांधी यांची हत्या करणाऱ्या Nalini Sriharan यांची पहिली प्रतिक्रिया)

त्याचवेळी राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषी नलिनी श्रीहरन यांची वेल्लोर तुरुंगातून सुटका करण्यात आली. नलिनी श्रीहरन यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितलं की, "मी तामिळनाडूच्या लोकांची आभारी आहे, ज्यांनी मला 32 वर्षे साथ दिली. मी राज्य आणि केंद्र सरकार दोघांचेही आभार मानते." राजीव गांधी हत्या प्रकरणातील नलिनी श्रीहरन आणि इतर चार दोषींची शनिवारी संध्याकाळी तामिळनाडूतील तुरुंगातून सुटका करण्यात आली. वेल्लोरमधील महिलांसाठीच्या विशेष तुरुंगातून सुटल्यानंतर लगेचच, नलिनी वेल्लोर मध्यवर्ती कारागृहात गेली, जिथून तिचे पती व्ही. श्रीहरन उर्फ ​​मुरुगन यांची सुटका झाली. नवऱ्याला भेटल्यानंतर नलिनी भावूक झाल्या.

सर्वोच्च न्यायालयाने नलिनी श्रीहरन आणि आर. पी. रविचंद्रन यांची मुदतपूर्व सुटका करण्याचे आदेश शुक्रवारी दिले. न्यायमूर्ती बी.आर. गवई आणि न्यायमूर्ती बी.व्ही. नगररत्न यांच्या खंडपीठाने नमूद केले की, या प्रकरणातील दोषींपैकी एक आरोपी ए.जी. पेरारिवलनच्या खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेला निकाल या दोन प्रकरणांमध्येही लागू आहे.

घटनेच्या कलम-142 अंतर्गत मिळालेल्या अधिकाराचा वापर करून, सर्वोच्च न्यायालयाने 18 मे रोजी पेरारिवलन यांची सुटका करण्याचे आदेश दिले होते. ज्यांनी 30 वर्षांपेक्षा जास्त कारावास पूर्ण केला होता. 21 मे 1991 च्या रात्री राजीव गांधी यांची तामिळनाडूच्या श्रीपेरंबदुर येथे एका निवडणूक सभेदरम्यान हत्या करण्यात आली होती. यासाठी धनू नावाच्या महिला आत्मघातकी हल्लेखोराचा वापर करण्यात आला.