Representational Image (Photo Credits: PTI)

भारतावर सध्या आर्थिक मंदीचे सावट पसरले आहे. त्यामुळे याचा परिणाम देशातील रोजगारावर झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा म्हणजेच 2020 या वर्षात नोकरीच्या संधी 16 लाखांनी कमी होणार आहे. याबाबत 'स्टेट बँक ऑफ इंडिया'ने अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार, 2019-20 या वर्षामध्ये मागील वर्ष 2018-19 च्या तुलनेत 16 लाख नोकऱ्या कमी होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 2017-18 या वर्षात एकून 89.7 लाख रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या होत्या. कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या (ईपीएफओ) आकडेवारीनुसार, 2018-19 मध्ये 89.7 लाख रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या होत्या. 2019-20 या वर्षात यात 15.8 लाखांची घट होण्याची शक्यता आहे.

देशाच्या अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट असल्यामुळे विरोधी पक्षांकडून भाजप सरकारवर जोरदार टीका केली जाते. आर्थिक मंदीनंतर नागरिकांना आता महागाईची झळ बसणं चालू झालं आहे. मागील काही दिवसांपासून सरकारी नोकऱ्यांमध्ये मोठी घट झाली आहे. केंद्र सरकारने मे 2019 मध्ये बेरोजगारीचा स्तर मागील 45 वर्षांच्या उच्च स्तरावर पोहोचल्याचे म्हटले होते. आर्थिक मंदीमुळे अनेक कंपन्यांना दिवाळखोरीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे.  (हेही वाचा - Sarkari Naukri 2020 Western Railway Recruitment: तुम्ही इयत्ता 10 उत्तीर्ण आहात? तुमच्याकडे ITI प्रमाणपत्र आहे? मग तुम्हाला रेल्वे कर्मचारी होण्याची संधी आहे!)

सध्या देशात रोजगाराच्या संधी वाढण्यापेक्षा त्या कमी होतानाचे चित्र स्पष्ट होत आहे. अनेक कंपन्या डबघाईला आल्यामुळे त्यांनी आपल्या कंपनीतील कामगारांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्यामुळे आसाम, बिहार, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि ओडिशा आदी राज्यांतील मजूर नोकरीसाठी दुसऱ्या राज्यात गेले आहेत.