Tur Dal Import Duty: होळीपूर्वी सर्वसामान्यांना दिलासा देत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. तूरीवरील आयात शुल्क पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आता संपूर्ण तूर डाळ बाहेरून आयात करण्यासाठी कोणतेही आयात शुल्क भरावे लागणार नाही, त्यामुळे डाळ स्वस्त होणार आहे. आतापर्यंत सरकारने तूर डाळीवर 10 टक्के आयात शुल्क लावले होते, ते आता पूर्णपणे रद्द करण्यात आले आहे.
संपूर्ण तूर डाळीवरील शुल्क हटवण्याचा आदेश अर्थ मंत्रालयाने 3 मार्च रोजी जारी केला आहे. हा आदेश 4 मार्चपासून म्हणजेच आज शनिवारपासून लागू होणार आहे. पुढील आठवड्यात होळी आहे, त्यामुळे होळीपूर्वी स्वस्तात डाळ खरेदी करण्याची संधी लोकांना मिळणार आहे. (हेही वाचा - Karnataka High Court: मोबाईल फोनसोबत विकल्या जाणाऱ्या चार्जरवर वेगळा कर आकारला जाऊ शकत नाही; कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्वाळा)
दरम्यान, डाळीवरील 11 टक्के आयात शुल्क हटवल्यानंतर डाळींच्या किमती कमी होणार आहेत. केंद्र सरकारने सीमाशुल्क कायदा, 1962 अंतर्गत संपूर्ण तूर डाळीवरील आयात शुल्क हटविण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय खाद्यतेलाचे भावही कमी होणार आहेत.
महागाईमुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लागली आहे. 1 मार्चापासून गॅससिलिंडरचे दर 50 रुपयांनी वाढले तर कमर्शियल सिलिंडरचे दर 350 रुपयांनी वाढले. महागाईमुळे सामान्य जनतेचे गणित विस्कटले आहे. मात्र, तूर दाळीचे दर कमी झाल्याने जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे.