Jammu and Kashmir: उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा (Bandipora) जिल्ह्यात शुक्रवारी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर ग्रेनेड हल्ला झाला. या हल्ल्यात जम्मू-काश्मीर पोलिसांचे एसपीओ शहीद झाले असून 5 जवान जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, हल्लेखोरांना पकडण्यासाठी सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून शोध मोहीम सुरू केली आहे.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने आज तकला सांगितले की, दहशतवाद्यांनी निशात पार्कजवळील नाका पार्टीवर ग्रेनेड फेकले. या घटनेत एका पोलीस अधिकाऱ्याला प्रत्युत्तर देताना आपला जीव गमवावा लागला आहे. त्याचवेळी 4 जवान जखमी झाले. या जखमींमध्ये सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि तीन पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. (वाचा - BSF Recruitment 2022: बीएसएफमध्ये बंपर भरती, 800 जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, जाणून घ्या किती असेल पगार)
खोऱ्यात सुरक्षा दलाच्या कारवाईमुळे संतप्त झालेल्या दहशतवाद्यांनी ही घटना घडवली आहे. भारतीय लष्कर, बीएसएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांसह इतर सुरक्षा दल काश्मीरमध्ये सतत शोध मोहीम राबवत असल्याची माहिती आहे. गेल्या रविवारीच बारामुल्लामध्ये सुरक्षा दलांनी सीमेपलीकडून येणारे 18 कोटींचे ड्रग्ज जप्त करून दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले होते.
#Update | One police personnel has lost his life, 4 injured after terrorists hurled grenade on a joint party of police and BSF in J&K's Bandipora
— ANI (@ANI) February 11, 2022
याआधी, सोमवारी दहशतवाद्यांनी गंदरबल जिल्ह्यातील चापरगुंड भागात सशस्त्र सीमा बल (एसएसबी) बंकरवर ग्रेनेड फेकून हल्ला केला. सुदैवाने हा ग्रेनेड बंकरवर न पडता रस्त्यावर पडला आणि त्याचा स्फोट झाला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधातील कारवाई तीव्र केली आहे. जानेवारी महिन्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये 11 चकमकी झाल्या आहेत. यामध्ये 21 दहशतवादी मारले गेले आहेत. गेल्या 2 महिन्यांत जम्मू-काश्मीरमध्ये 9 पाकिस्तानी दहशतवादी मारले गेले आहेत.