Pune: पुण्यात 'टोर्नेडो' जातीच्या डासांनी घातले धुमाकूळ, थव्याचा व्हिडीओ पाहून व्हाल थक्क
Swarm of Mosquitoes

Pune, Maharashtra: मुळा मुठा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे पुण्यातील केशवनगर आणि खराडी गावठाण भागातील आकाशात डासांनी थवा निर्माण केला आहे. पुण्यातील रहिवासी 'टोर्नेडो' डासाचे दुर्मिळ दृश्य पाहिल्यानंतर थक्क झाले आहेत. या दृश्याचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला असुन सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. असामान्य घटना काहींना आश्चर्यकारक वाटली असुन काहींसाठी चिंतेचा विषय बनला आहे, काहींनी याला 'धोकादायक' असल्याचे म्हटले आहे. डासांच्या त्रासाविषयी एएनआयशी बोलताना खराडी येथील स्थानिक नितीन म्हणाले की, "अलीकडेच मी खूप डास पाहिले आहेत. तीन-चार दिवसांपासून खराडी येथे डासांचा धुमाकूळ सुरू आहे.  येथे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत आणि त्यामुळे स्थानिकांना अडचणी येत आहेत." 

पाहा व्हिडीओ:

 

खराडी येथील आणखी एक स्थानिक अभिषेक यांनी देखील सांगितले की, "आमच्या भागात खूप डास आहेत. पुणे कॉर्पोरेशनने त्यावर लवकरात लवकर उपाय योजना कराव्या. हे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक आहे."  यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनच्या मते, डासांना जगातील "प्राणघातक प्राणी" मानले जाते, डासांमुळे लाखो लोकांचा मृत्यू होतो आणि लाखो लोक दरवर्षी आजारी पडतात. डासांमुळे मलेरिया, डेंग्यू सारखे आजार होतात.

शहरातील अलीकडील हवामानामुळे कीटकांसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले असुन त्या मुळे डासांच्या संख्येत वाढ होत आहे. तथापि, डासांच्या समस्येचे व्यवस्थापन करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे कीटकांच्या संख्येत वाढ न होऊ देणे.  साचलेले पाणी हे डासांच्या प्रजननाचे प्रमुख ठिकाण आहे डास साचलेल्या पाण्यात अंडी घालतात. डास मारण्यासाठी कीटक फवारण्या करण्यात आल्या पाहिजे, उघड्या त्वचेवर प्रभावी डास प्रतिबंधक वापरणे; आणि साचलेले पाणी काढून टाकणे, जे डासांशी संबंधित समस्या प्रभावीपणे नियंत्रित करण्यात मदत करू शकते.