(Photo Credit - Pixabay)

देशात कोरोना संसर्गाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. महामारी रोखण्यासाठी राज्य सरकारांनी कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र या नियमांचे पालन करण्याकडे नागरिक दुर्लक्ष करत आहेत. गुजरातमधील (Gujarat) अहमदाबादमध्ये (Ahmedabad) काही लोकांनी पाळीव कुत्र्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी कोरोना नियमांचे उल्लंघन केले. याप्रकरणी पोलिसांनी 3 जणांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाळीव कुत्र्याचा वाढदिवस साजरा करताना या लोकांनी कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केले. यानंतर दोन भावांसह ३ जणांना अटक करण्यात आली. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, चिराग पटेल आणि त्याचा भाऊ उर्विश पटेल हे दोघेही अहमदाबाद शहरातील कृष्णनगरचे रहिवासी आहेत. आपल्या पाळीव कुत्र्याच्या वाढदिवसा निमित्त त्याने त्याचा मित्र दिव्येश महारियासोबत एक मोठी पार्टी दिली होती.

त्यांच्या कुत्र्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी शुक्रवारी रात्री एका प्लॉटवर आयोजित केलेल्या कार्यक्रमात तिघांच्या कुटुंबियांव्यतिरिक्त त्यांचे मित्रही मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात, सामाजिक अंतर आणि फेस मास्क घालण्यासंबंधी कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करण्यात आले. पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कार्यक्रमात एका लोकप्रिय लोकगायकाने सादरीकरण केले आणि केकही कापला गेला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या सोहळ्यात कुटुंबाने सुमारे 7 लाख रुपये खर्च केले.

या प्रकरणी पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता आणि विविध कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्यानंतर चिराग पटेल, उर्विश पटेल आणि दिव्येश महारिया यांना अटक करण्यात आली. (हे ही वाचा Karnataka Crime: विकृतीचा कळस ! कर्नाटकमध्ये शाळेत मोबाईल आणला म्हणून मुख्याध्यापिकेने विद्यार्थीनीला केले विवस्त्र)

कोरोना संसर्गाच्या बाबतीत महाराष्ट्र आणि दिल्लीनंतर गुजरात सर्वाधिक प्रभावित राज्य आहे. जिथे कोरोनाची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. राज्यातील कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेऊन राज्य सरकारने कडक निर्बंध लादले आहेत. यामध्ये नाईट कर्फ्यू, सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क घालणे यासारख्या नियमांचा समावेश आहे.