Election Voting प्रतिकात्मक प्रतिमा

Legislative Council Election 2024: लोकसभा निवडणूक संपली की राज्याच्या राजकीय वर्तुळाला थोडी उसंत मिळण्याची शक्यता लगोलग आलेल्या विधान परिषद निवडणूक 2024 ने संपली आहे. विधमंडळाच्या वरिष्ठ सभागृहातील चार सदस्यांचा कार्यकाळ 7 जुलै रोजी समाप्त होत आहे. विधान परिषदेच्या शिक्षक (Teacher Constituency Election) आणि पदवीधर (Graduate Constituency Election) अशा प्रत्येकी दोन आणि एकूण चार मतदारसंघात निवडणूक होऊ घातली आहे. त्यासाठीचे बिगूल वाजले असून निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. विधानपरिषदेतील कोणत्या आमदारांचा कार्यकाळ समाप्त होतो आहे. तसेच, कोणत्या मतदारसंघात निवडणूक पार पडेल, याविषयी जाणून घ्या.

कार्यकाळ संपत असलेले विधानपरिषद सदस्य

विलास विनायक पोतनीस - मुंबई पदवीधर

निरंजन वसंत डावखरे - कोकण पदवीधर

किशोर भिकाजी दराडे - नाशिक शिक्षक

कपिल हरिश्चंद्र पाटील - मुंबई शिक्षक

निवडणूक जाहीर झालेले विभाग, मतदान आणि निकालाची तारीख

मुंबई, नाशिक आणि कोकण या विभागात निवडणूक जाहीर झाली असून येत्या 10 जूनला मतदान होणार आहे. निवडणूक जाहीर झालेल्या विभागांपैकी दोन विभागात पदवीधर तर दोन विभागात शिक्षक मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. यापैकी मुबई आणि कोकण विभागात पदवीधर तर नाशिक आणि मुंबईसाठी शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक पार पडत आहे. जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार 13 जून रोजी मतमोजणी पार पडेल.

पदवीधर मतदारसंघ मतदारांसाठी नोंदणी आवश्यक

पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघ यांमधून निवडणूक लढविण्यासाठी आणि मतदान करण्यासाठी काही नियम आहेत. पदवीधर मतदारसंघातून मतदान करण्यासाठी संबंधित उमेदवाराने रितसर नोंदणी करणे आवश्यक असते. पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी मतदाराने किमान तीन वर्षे आगोदर आपला पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेला असणे गरजेचे असते.

दरम्यान, देशभरात लोकसभा निवडणूक ऐन बहरात आली आहे. एकूण 7 टप्प्यांमध्ये पार पडत असलेल्या या निवडणुकीतील तीन टप्प्यांचे मतदान झाले आहे. महाराष्ट्रातही तिन टप्प्यांतील मतदान पूर्ण झाले आहे. आता सर्व देशामध्ये उर्वरीत चार टप्प्यांमध्ये मतदान पार पडणार आहे. त्यानंतर येत्या 4 जून रोजी निवडणूक मतमोजणी होईल आणि निकाल जाहीर केला जाईल. निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी प्रणित एनडीए विरुद्ध काँग्रेस आणि मित्रपक्षांनी स्थापन केलेल्या 'इंडिया आघाडी'मध्ये काट्याची टक्कर आहे. निवडणूक प्रचार बहरात आला असून शहकाटशह, आरोप प्रत्यारोपांना धार आली आहे. हिंदुत्त्व, महागाई, बेरोजगारी यांसह इतरही अनेक मुद्दे चर्चेला येत आहेत. राजकीय पक्षांकडून सभा, प्रभातफेऱ्या, पदयात्रांवर जोर दिला जात आहे. त्यासोबतच डिजिटल मीडियाचा वापर करुन हायटेक प्रचारालाही प्राधान्य दिले जाऊ लागले आहे.