Social Media Trolling:  देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह दिग्गज भाजप  नेत्यांना सोशल मीडियावर नेटीझन्स करतायत विरोध? ट्रोलर्स खरे की खोटे?
Trollers | (Photo credit: archived, edited, symbolic images)

अत्यंत अल्प किमतीत किंवा अगदी फ्री इंटरनेट डेटा (Free Internet Data) आणि सोशल मीडिया (Social Media) नावाचे हत्यार हातात आल्यापासून ट्रोलींग हा प्रकार प्रचाराच्या केंद्रस्थानी आला आहे. सभ्य, वेशीवर टांगून आपल्या नावडत्या लोकांना सोशल मीडियावर ट्रोल (Troll) करणे हा जणून अनेकांचा छंदच बनला आहे. यात सर्वसामान्य नागरिक ते पेज थ्री कल्चरवाले सेलिब्रिटी ते अनेक राजकीय पक्षांचे दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. ऐश्वर्या राय बच्चन, थैमूर, विराट कोहली, माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांच्यापासून ते थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, यूएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, किम जोंग आणि दिवंगत पंतप्रधान पंडित नेहरु, महात्मा गांधी यांनाही सोडले जात नाही. गेल्या काही महिन्यांपासून खास करुन कोरोना व्हायरस संकट नियंत्रणात घेण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात महाराष्ट्र विधान सभेतील विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर ( Sudhir Mungantiwar), माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे (Vinod Tawde), आमदार राम कदम आणि अनेक भाजप नेत्यांना ट्रोल करण्यात येत आहे. खरोखरच हे ट्रोलर्स खरे असतात का? की फेक ट्रोलर्सच्या मार्फत विवध राजकीय नेत्यांवर चिखलफेक केली जाते? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न केला. त्यासाठी नमुन्यादाखल देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवर, विनोद तावडे या भाजप नेत्यांच्या फेसबुक अकाऊटवरील काही पोस्ट विचारात घेण्यात आल्या. या नेत्यांचीच अकाऊंट निवडण्यामागे कारण असे की, भाजप नेत्यांनी महाराष्ट्र पोलिसांना नुकतेच एक पत्र दिले आणि ट्रोलर्सवर कारवाई करण्याची मागणी केली.

आता भारतीय जनता आणि विविध क्षेत्रातील लोकांना ट्रोलींग चांगलेच परिचयाचे झाले आहे. मात्र, सोशल मीडिया आणि ट्रोलिंग या क्षेत्रातील अभ्यास सांगतात की सन 2014 पासून सोशल मीडियावरील ट्रोलीग हा प्रकार भारतात मोठ्या प्रमाणावर वाढला. (संदर्भ. आय अॅम अ ट्रोल, स्वाती चतुर्वेदी. मराठी अनुवाद, मुग्धा कर्णिक) . सन 2014 पासून पुढच्या काळात राजकीय नेते, कलाकार, सामाजिक कार्यकर्ते यांना सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणावर ट्रोल करण्यात आले. नेत्यांचे फोटो मॉर्फ करणे, नेत्यांच्या घरातील महिला, नातेवाईक यांना बलात्काराच्या धमक्या देणे, अश्लिल आणि बिबत्स भाषेत प्रतिक्रिया व्यक्त करणे. लोकांच्या खासगी आयुष्याबद्दल बोलणे हा प्रकार सोशल मीडियात मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाला. विरोधकांनी तर अनेकदा आरोप लावला की, सत्ताधारी पक्ष ट्रोलर्सच्या माध्यमांतून विरोधी पक्षांच्या नेत्यांना ट्रोल करत आहे. तर, सत्ताधाऱ्यांनीही अनेकदा विरोधी पक्षातील लोक जाणीवपूर्वक बदनासाठी ट्रोलर्सची मदत घेत असल्याचे प्रत्युत्तर दिले.

ट्रोलर्स दोन्ही बाजूचे असतात. सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूंनी ट्रोलर्स ट्रोल करत असतात. ट्रोलींग केवळ राजकीय असते किंवा राजकीय व्यक्तिमत्वांचेच केले जाते असे नाही. सामाजिक, सांस्कृती क्षेत्रांतील नागरिकांनाही याचा फटका बसतो. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिवसेना सरकार (2014-2019) सत्तेत होते तेव्हा जलस्वराज्य योजनेच्या गितावरुन देवेंद्र फडणवीस, त्यांच्या सौभाग्यवती अमृता फडणवीस, सुधीर मुनगंटीवर चांगलेच ट्रोल झाले होते. ट्रोलर्सकडे विशेष लक्ष द्यायचे नसते हा प्रकार मी विनोदाने घेतो, अशा आशयाची मिष्कील प्रतिक्रियाही तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली होती. मात्र, त्या काळात सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे या मंडळींना मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आले. विशेष म्हणजे अशा ट्रोलर्स विरोधात कारवाई करावी, अशी मागणी तेव्हा कोणत्याच नेत्याने अथवा राजकीय पक्षाने पोलिसांकडे केली नाही.

महाराष्ट्रापुरते बोलायचे तर केवळ विरोधी पक्षातील भाजपच नव्हे तर, सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातील नेतेही ट्रोल होत असल्याचे पाहायला मिळते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार अजित पवार, यांना आजही ट्रोल केल्याचे पाहायला मिळते. ट्रोलिंगचे प्रमाण अनेकांच्या बाबतीत कमी अधिक आहे  इतकेच.  (हेही वाचा, Coronavirus: भाजप नेते सोशल मीडियावर ट्रोल, अनेकांनी पोस्टच केल्या डिलीट; विनोद तावडे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती)

देवेंद्र फडणवीस फेसबुक अकाऊंट

विनोद तावडे फेसबुक पोस्ट

विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आणि भाजपच्या इतर काही नेत्यांनी पोलिसांना नुकतेच एक निवेदन दिले. या निवेदनात या ट्रोलर्सवर कारवाई करवी अशी मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही ट्रोलर्सवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. मध्यंतरी घडलेले अनंत करमुसे बेदम मारहाण प्रकरणही ट्रोलींग प्रकारातूनच घडल्याचे सांगितले जाते. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यांचे  60% फॉलोअर्स हे फेक असल्याची माहिती Twiplomacy नावाच्या एका संस्थेने दिली होती. या संस्थेने यूएस प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प, पोप फ्रान्सीस आणि किंग सुलेमान यांचेही फॉलोअर्स  फेक असल्याचे म्हटले होते. Twiplomacy  ची माहिती पाहात केवळ ट्रोलर्सच नव्हे तर फॉलोअर्सही फेक असल्याचे पुढे येते.

Twiplomacy ट्विट

देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवर, राम कदम, चंद्रकांत पाटील आदी नेत्यांच्या फेसबुक अकाऊंटला भेट दिल्यास ट्रोलर्सबाबतची पूर्ण आणि तंतोतंत माहिती हाती येत नसली तरी. काही ठोकताळे आणि ढोबळ माहिती हाती लागते. या माहितीनुसार ध्यानात येते की देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजप नेत्यांना ट्रोल करणाऱ्यांमध्ये साधारण 65 ते 70 ते ट्रोलर्स हे खरे म्हणजेच अॅक्टीव फेसबुक अकाऊंटवरुन ट्रोल करत असल्याचे दिसते. तर उर्वरीत 35 ते 40 टक्के ट्रोलर्स हे फेक असल्याचे जाणवते. कारण या ट्रोलर्सच्या फेसबुक अकाऊंटला भेट दिल्यास अकाउंट असलेल्या व्यक्तीचे स्वत:चे छायाचित्र प्रोफाईला पाहायला मिळत नाही. तसेच, काही अकाऊंटवर नजिकच्या काळात कोणतीही पोस्ट, केलेले आढळत नाही. या लोकांचे फेसबुक फ्रेंडही तुलनेत कमी किंवा दोन अंकी असतात. हे ट्रोलर्स प्रतिक्रिया मात्र देत असतात. या वरुन ध्यानात येते की हे ट्रोलर्स फेक आहेत.

भाजप आमदार अॅड आशिष शेलार ट्विट

दरम्यान, ट्रोलिंग हे चांगले की वाईट, ट्रोलर्स खरे असो की फेक मुद्दा तो मुळीच नाही. मुद्दा आहे तो ट्रोलिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या भाषेचा. अनेकदा अनेक ट्रोलर्स अतिशय गलीच्छ, अश्लील आणि शिवराळ भाषा वापरतात. टीका करण्याचा अधिकार सर्वांना आहे. मात्र ही टीका करत असताना. खास करुन सोशल मीडियावर ट्रोलींग या प्रकारात मोडणारी टीका करत असताना सामाजिक नैतिकतेचे भान आवश्यक असते. अनेक ट्रोलर्सना ते दिसत नाही. भाजपसारख्या विरोधी पक्षाने पोलिसांना निवेदन दिले आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही चौकशीची मागणी केली आहेत. आता पोलीस काय भूमिका घेतात याबाबत उत्सुकता आहेच.