Ramdas Athawale Advice Congress Party:  राहुल गांधी तयार नाहीत? काँग्रेस पक्षात राष्ट्रवादी  विलीन करा शरद पवार यांना अध्यक्ष बनवा, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा सल्ला
Ramdas Athawale | (Photo Credits: Twitter)

केंद्रीय मंत्री, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी अध्यक्षपदावरुन राष्ट्रीय काँग्रेस (Indian National Congress) पक्षाला एक खोचक सल्ला दिला आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi), सोनिया गांधी (Sonia Gandhi) अथवा गांधी परिवारातील कोणतीही व्यक्ती जर काँग्रेस पक्ष अध्यक्ष होण्यास तयार नसेल तर शरद पवार (Sharad Pawar) यांना पक्षाचे अध्यक्ष बनवा. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) काँग्रेस पक्षात विलीन करा, असे आठवले यांचे म्हणने आहे. रामदास आठवले यांनी ट्विटरच्या माध्यमातून काँग्रेसला हा सल्ला दिला आहे.

रामदास आठवले यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ''काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारण्यास सध्या राहुल आणि सोनिया गांधीही तयार नाहीत. माझी काँग्रेसला सूचना आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस मध्ये विलीन करून शरद पवार यांना काँग्रेस चे अध्यक्ष करावे.याबाबतचा निर्णय पवार आणि काँग्रेस यांनी घ्यावा''.

लोकसभा निवडणूक 2019 मध्ये झालेल्या पराभवानंतर राहुल गांधी यांनी नैतीक जबाबदारीचा मुद्दा पुढे करत पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यामळे रिक्त झालेल्या पदावर सोनिया गांधी यांची हंगामी अध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस पक्षातून पुन्हा एकदा काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष हवा असल्याची मागणी जोर धरत आहे. ही मागणी लावून धरत काँग्रेसमधील काही नेत्यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्रही लिहीले.

काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात पक्षाला पूर्णवेळ अध्यक्षाची आवश्यकता आहे. जर गांधी कुटुंबातील कोणीही व्यक्ती पक्षाध्यक्ष होण्यास तयार नसेल तर पक्षातील इतर नेत्याला त्या पदावर नियुक्त करावे अशी मागणी या पत्रात करण्यात आली होती. या पत्रावरुन काँग्रेसमध्ये गांधी परिवार समर्थक आणि इतर नेते असे दोन गट पडले आहेत. या पत्रानंतर काँग्रेस वर्किंग कमीटी बैठकीतही जोरदार पडसाद उमटले.

दरम्यान, काँग्रेस नेत्यांच्या पत्राला उत्तर देताना सोनिया गांधी यांनी आपणही पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यायला तयार आहोत. सर्वांनी एकत्र या कार्यक्षम आणि पूर्ण वेळ देणाऱ्या नेत्याची अध्यक्ष पदासाठी निवड करा असे म्हटले. तेव्हापासून काँग्रेसमध्ये अजूनही पडसाद उमठत आहेत.