Raj Bhavan | (Photo Credits: Raj Bhavan)

राज्यासमोर कोरोना व्हायरस (Coronavirus) संकट नियंत्रणाचे मोठे आव्हान आहे. हे आव्हान कायम असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) सरकार अस्थिर आहे किंवा ते कोसळणार असे भाकीत विरोधी पक्षाती अनेक नेते व्यक्त करत आहेत. दरम्यानच्या काळावत राजभवनावर जाऊन राज्यपालांच्या गाठीभेटींचे प्रमाणही वाढले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (Shiv Sena) मुखपत्र अशी ओळख असलेल्या दै. सामना संपादकीयातून विरोधकांना इशारा देण्यात आला आहे. हा इशारा देताना 'राजभवनातील गंजलेल्या तोफांतून सरकार पाडणार असल्याचे मनसुबे कोणी रचू नयेत', असे म्हटले आहे.

राजभवनातील तोफा (गंजलेल्या) या मथळ्याखाली लिहिलीलेल्या सामना संपादकीयात म्हटले आहे की 'राजभवनाच्या दारात उभे राहून राष्ट्रपती राजवटीची मागणी करणे आता नेहमीचेच झाले आहे. ही मागणी त्यांनी गुजारतेत जाऊन करण्याची हिंमत दाखवावी. महाराष्ट्रात त्याची गरज नाही. दोनेक वर्षांपूर्वी राजभवनाखाली एक ब्रिटिशकालीन भुयार सापडले. त्यात काही जुन्या गंजलेल्या तोफा वैगेरे सापडल्याचे तेव्हा सांगितले गेले. महाराष्ट्रातील सरकार पडणार असे आवाज त्या गंजलेल्या तोफांतून काढावेत असे मनसुबे कोणी रचू नयेत. जुन्या तोफा म्हणजे हवा-पाण्याची नळकांडीच ठरतात. राजभवनातील हवा-पाणी गढूळ होणार नाही यांची आम्हाला खात्री आहे.'

दरम्यान, राजभवनात काय चालले आहे यावर सध्या बातम्यांचा बाजार गरम झाला आहे. उष्णतेच्या तीव्र लाटेटेने सध्या महाराष्ट्र भाजून निघत आहे. मराठवाड्यात गरमीचा पारा 45 अंशावर तर विदर्भात त्याहून वर गेला आहे. खान्देश आणि मुंबईतही ज्वाळा उसळल्या आहेत. तापमानाचा पारा 45 वर गेल्यानंतर कोरोनाचा विषाणू जिवंत राहणार नाही असा एक समज होता. तो गैरसमज ठरला आहे. उन्हाळा आहे, विषाणूही आहे आणि सरकार विरोधकांचा किडादेखील वळवळत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर थंड मलबार हिलवरच्या राजभवनाचे वारेही गरम झाले आहेत, असे गरमागरम बातम्यांवरुन दिसते, असेही सामना संपादकीयात म्हटले आहे. (हेही वाचा, नेपाळचे भारताला आव्हान, भक्त आणि त्यांचे दिल्लीश्वर कोणती पावले उचलणार?, शिवसेना मुखपत्र सामना संपादकीयातून केंद्र सरकारवर टीका)

गेल्या काही काळात विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून राज्यपालांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. त्यावर भाष्य करताना सामनात म्हटले आहे की, राज्यपालांच्या भएटीगठी ही एकप्रकारे सुखद भेट ठरत असते. सरकार बनवणारे व सरकार पाडू इच्छिणारे असे सगळेच जण राजभवनाच्या पाहुणचाराचा आनंद घेत असतात. या आनंदास गेल्या काही दिवसात भरते आल्याचे दिसत असेल तर त्यात सध्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्याकीर यांचा काय दोष? ते एक सरळमार्गी, नाकासमोर चालणारे एक विचारी सद्गृहस्थ आहेत. 'संघ विचारांचा झेंडा खांद्यावर घेऊन आयुष्य वेचणारे ते एक संतमहात्मा आहेत.' राजभवनावर बसून राजकीय काड्या घालण्याचे उद्योग असे संतमहात्मा करतील यावर विश्वास ठेवता येणार नाही, असा टोलाही सामना संपादकीयातून लगावण्यात आला आहे.