नेपाळचे भारताला आव्हान, भक्त आणि त्यांचे दिल्लीश्वर कोणती पावले उचलणार?, शिवसेना मुखपत्र सामना संपादकीयातून केंद्र सरकारवर टीका

चीनच्या कच्छपी लागून भारताचा शेजारी नेपाळ (Nepal) या देशाने लिंपीयाधुरा (Limpiyadhura) प्रदेशावर दावा सांगितला आहे. नेपाळच्या या दाव्यानंतर शिवसेना (Shiv Sena) मुखपत्र अशी ओळख असलेल्या दै. सामना (Saamana Editorial) संपादकीयातून केंद्र सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आहे. 'चीनच्या कच्छपी लागून नेपाळ हिंदुस्तानला आव्हान देत असेल तर भक्त मंडळी आणि दिल्लीश्वर कोणती पावले उचलणार? हा प्रश्नच आहे. नेपाळची मुंबई हत्तीच्या कानात शिरली आहे, पण हत्ती सोंडेचे फटके मारायला तयार नाही. मुंगीचा रंग हिरवा नाही, हेच खरे रहस्य आहे', अशा शब्दात सामना संपादकीयातून केंद्र सरकारवर हल्ला चढविण्यात आला आहे.

'मुंगी हत्तीच्या कानात शिरलीच हो! नेपाळची आगळीक' या मथळ्याखाली लिहिलेल्या संपादकियात म्हटले आहे की, जग कोरोनाशी लढत असताना अनेक देश अजूनही सीमावादातच अडकले आहेत. त्या राष्ट्रांत आता नेपाळची भर पडावी याचे आश्चर्य वाटते. नेपाळसारख्या कायम परावलंबी राष्ट्रानेही हिंदुस्थानच्या भूभागावर दावा केला आहे. नेपाळ सरकारने जो नवा नकाशा मंजूर केला आहे. त्यात लिपुलेख, कालापानी, लिंपायाधुरासारखे महत्त्वाचे संवेदनशील भाग 'नेपाळ'चे म्हणून दाखवले आहेत. नेपाळने हे करावे हे आम्हास आक्रित वाटत नाही. नेपाळ नेहमीच चीन आणि पाकिस्तानच्या ओंजळीने पाणी पीत असतो. चीन आणि पाकिस्तान नेपाळच्या खांद्यावर बंदूक ठेऊन हिंदुस्थानवर हल्ले करीत असतात. नेपाळ हे कधीकाळी हिंदू राष्ट्र वैगेरे होते. नेपाळचा राजा हा विष्णूचा अवतार समजला जात असे. पण, विष्णूच्या भूमीवर आज हिंदुस्थानविरुद्धच्या कटकारस्थानांचे 'फड' बसले आहेत व नेपाळचे नवे 'नकाशा' प्रकरण हा त्यातलाच एक भाग आहे.

दरम्यान, लिपुलेख या भागात हिंदुस्थान, नेपाळ आणि चीनची सीमा एकत्र येते. त्यामुळे हा भाग चीनच्या डोळ्यात आहे. नेपाळचे सरकार 'चीन' चालवीत आहे. हिंदुस्थानचे नेपाळवर कोणतेही नियंत्रण नाही. नेपाळच्या बाबतीतली सर्व राजनैतिक मुत्सद्देगिरी गेल्या पाच-सहा वर्षात अपयशी ठरताना दिसत आहे. मुख्य म्हणजे नेपाळ व हिंदुस्थानची धर्मिक, सांस्कृतिक, सामाजिक नाळ एक आहे. पण नेपाळला चीन आणि पाकिस्तान जवळचा वाटतो, असेही सामना संपादकियात म्हटले आहे. (हेही वाचा, Coronavirus: महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची हीच ती वेळ, उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी, काँग्रेसपासून दूर रहावे अन्यथा त्यांचे राजकारण संपेल- सुब्रमण्यम स्वामी)

केंद्र सरकारवर टीका करताना पुढे म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी हे दोनेक वर्षापूर्वी नेपाळ दौरा करुन आले. तेव्हा देशात उत्तर प्रदेश निवडणुकांचे मैदान सुरु होते. त्याच दिवशी पंतप्रधान काटमांडूस पोहोचले. तेथे पशुपतीनाथ मंदिरात जाऊन पूजा-अर्छा केली. गाईची पूजा केली. नेपाळला आर्थिक मदत केली. सीतामाईच्या नावाने एक विशेष रेल्वे गाडी सोडण्याची घोषणा करुन पंतप्रधान परत आले. उत्तर प्रदेशातील हिंदू मतांना प्रभावित करण्याची ही नामी शक्कल होती. नेपाळ व आपल्यात कसे भावनिक नाते आहे वैगेरे सांगायलाही आपले राज्यकर्ते विसरत नाहीत. पण नेपाळ खरोखरच आपले राहिले आहे काय? नपळातून हिंदी हद्दपार करण्यात आली आहे व चिनी भाषेचे शिक्षण देणारे वीस हजार शिक्षक तेथे पाच वर्षांपासून गावागावांतील शाळांमधये हिदू संस्कृतीवर माती फिरवत आहेत. यावर दिल्लीने काय कारवाई केली? असा सवालही शिवसेना मुखपत्र दै. सामना संपादकीयातून विचारण्यात आला आहे.